Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and riddles : घरांची नवलाई कविता आणि काव्यकोडी

Poems and riddles : घरांची नवलाई कविता आणि काव्यकोडी

घरांची नवलाई

सुगरणीचा झोपा
किती आहे गुणी
घुबडाची ढोली
फार फार जुनी

पोपटाचा पिंजरा
दांडीवर डोले
वारुळाकडे मुंगी
बिगीबिगी चाले

झाडावर जागोजागी
मधमाश्यांची पोळी
घराच्या कोनाड्यात
कोळ्यांची जाळी

कोंबडी खुराड्यात
फिरेफिरे तुरुतुरु
उंदराची बिळात
पळापळ सुरू

घोड्याचा पागा
तोच तो तबेला
गायीच्या गोठ्यात
आसरा म्हशीला

चिमणीच्या घरट्याला
जागेचा ना तोटा
हत्तीचा पिलखाना
केवढा भला मोठा

अस्वलाची घळी
पाहिली का कुणी
सिंहाच्या गुहेची
भीतीच मनी

ही सारी निवाऱ्याची
नवलाई खरी
माणसाच्या घराची तर
बातच न्यारी

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) आईची मालिका
रोज तो लावतो
बाबांना बातम्या
रोज पुरवतो

ताईला दाखवतो
सिनेमा नवा
वटवट करणारा
हा कोण बुवा?

२) कधी सुखाचे
कधी दुःखाचे
कधी केवळ
शुभेच्छांचे

तिकीट लावून
फिरे दारोदारी
अवचित येई कोण
आपल्या घरी?

३) पंख नाही तरी
उडतो आकाशी
लांब शेपटीवाला
हा कोणता पक्षी
उंच फिरून आकाशात
दमत कसा नाही
संक्रातीला घिरट्या घालून
कोण फिरत राही?

उत्तर –
१) टीव्ही 
२) पत्र
३) पतंग 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -