Thursday, July 25, 2024

मध्यममार्ग

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

“साहेबराव” विनीतानं यजमानांना हाकारलं.
“साहेबराव?” सखीनं प्रश्न केला. भुवया उंचावल्या.
“अगं विनी, उत्तम असं सुंदर नाव आहे ना तुझ्या नवऱ्याचं? मग साहेबराव कशासाठी उगाचच्या उगाच?”
“त्यांना आवडतं.”
“पण तुला आवडतं का?”
“अगं सखी, त्यांना आवडतं ना? मी मध्यममार्ग निवडते.”
“मध्यममार्ग? मी समजले नाही,” सखीनं फोड मागितली.

“फोड हवीय? सांगते. आपण मध्यमवर्गीय माणसं. फारशा उड्या मारीत नाही.
बेताबेताने सारे जीवन जगतो. मध्यममार्ग निवडतो. तू बघ ना! लाखो रुपयांचे फ्रॉड
मध्यमवर्गीय माणूस करतो का? कधीच नाही. केले तरी ते पचविता आले पाहिजेत
ना?”

“आता कसं बोललीस?” विनीता खुशीनं मान डोलावीत म्हणाली. विनीतानं मग नवऱ्याला गेटपर्यंत सोबत केली.
यजमान म्हणाले की, “गाडी नेऊ? की
तू वापरणारेस?”
“नाही. मी रिक्षाने जाईन सखीबरोबर. दोघी शेअर करू रिक्षा.” आता गाडी म्हणजे स्कूटर हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल. मध्यमवर्गीय माणूस स्कूटरला ‘गाडी’ म्हणतोच म्हणतो. तेवढंच शब्दसौख्य हो!

“आता ५ वाजेपर्यंत नौरोजी मान मोडून काम करतील हपिसात.” विनिता सखीला म्हणाली. “तोवर मी मोकळीच मोकळी.”
“एखादा मॅटिनी टाकूया का गं? सखीनं आशेनं विचारलं.
“पुष्पा २ बघूया?” विनीतानं विचारलं.
“रिव्ह्यू चांगला आलाय का पेपरला?”
“अगं रिव्ह्यू चांगला छापावा म्हणून पत्रकारांना सिनेमावाले पैसे चारतात गं!”
“काय सांगतेस?”
“खरं तेच सांगते.”

मग दोघी सख्या, मैत्रिणी निघाल्या सिनेमा टूरवर.
“मॅटिनीचा दर तीनशे असतो गं. पैसे
आहेत ना?”
“हो मला ठाऊक आहेत मॅटिनीचे दर. मी ज्ञात करून घेतलेत.” विनीता नि सखी दोघी चित्रपटगृहात गेल्या. बऱ्यापैकी गर्दी बघून सुखावल्या. आपण काही अगदीच चम्या नाही. इतर शहाण्यांमध्ये आपलीच गणना होतीय,
हा आनंद हो!
“तू तिकिटाचे पैसे देशील ना गं विनीता?”
“का गं? अशी विचारतेस की…
पैसे नसल्यागत?”

“अगं खरंच तंगीय! मध्यमवर्गीय तंगी. आफ्टर ट्वेंटीनंतरची महिनाअखेर तंगी.”
“आहेत. माझे माझे मी भरीन.”
“मग ठीक. माझे माझे मी पण भरीन.”
“रिक्षा येता मी, जाता तू.”
“ठीक ठीक.” असं
दोघीचं ठरलं.

सिनेमागृहात शिरल्या दोघी. एसी चालू होता. गर्दी नसली की पंखे लावतात थिएटरवाले.
पण आज दोघी मैत्रिणींचे नशीब जोरावर होते. दुपारची उन्हाची वेळ नि तीन तास एसी! सिनेमा कसाही असला तरी चालणार होता. पैसा वसूल एसी ना? दोघी रांगेत बसल्या. पाय सैलावून बसल्या. थिएटरमध्ये बरी गर्दी बघून सुखावल्या. रिकामे थिएटर नको वाटते ना बघायला.

“कोण गं हिरॉईन?”
“नवीच आहे. पुष्पा एकचीच आहे
वाटतं मला.”
“कोणी का असेना… तीन तास मजेत जातील.”
“हो. तेही खरंच. अतिशय महत्त्वाचं!”
“विनीता, माझ्या सासूबाई प्रत्येक
चित्रपट बघतात.”
“हावरटच आहेत.”
“जीवात जीव आहे, चालवतंय तोवर
बघेन म्हणतात.”

“सासूबरोबर चित्रपट म्हणजे बेचव भेळ.”
“खरंच गं.” त्यांनी इकडे बघितलं, तिकडे बघितलं. सासू प्राणी नव्हता. खूश होऊन हलकीशी शीळही घातली नि दोघी चमकल्याच. काय झालं होतं?
दोन सिटा सोडून एक जोडपं बसलेलं. कोण?

साहेबराव नि त्यांची मैत्रीण!
“तुम्ही?” विनीता आश्चर्यानं म्हणाली. मग समजूतदार झाली. म्हणाली, “मध्यमवर्गीय माणूस आपापला मध्यममार्ग निवडतो.
सुखे बघा.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -