- हलकं-फुलकं : राजश्री वटे
पहिल्या पायरीला उजव्या हाताचा स्पर्श करून देवळाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतो… सर्व पायऱ्या चढल्यावर देवळाच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्या जवळच्या पायरीला स्पर्श करून पुन्हा नमस्कार करतो!
दर्शन झाल्यावर देवळाबाहेर येऊन आपण शांत मनाने पायरीवर क्षणभर बसतो… आणि मग वळतो… जायला! कुठल्याही दाराला पायरी असणं हे सकारात्मकता दर्शवते…
सणावाराला रांगोळ्या, फुलांनी पायऱ्यांना सजवून त्या वास्तूची शोभा वाढते! दिवाळीत पणत्यांनी प्रकाशमान होतात या पायऱ्या… मोठ्या बंगलेवजा घरांमध्ये वरती जायला दिवाणखान्यातून जीना असतो, वळणदार पायऱ्यांचा… त्याचा दिमाख काही औरच असतो!!
नवरी मुलगी सासरी निघते तेव्हा माहेरच्या पायऱ्यांवर मन रेंगाळते तिचे… पावले जड पडतात… इथेच मैत्रिणींसह गप्पाचे फड रंगले असतात… भविष्याचे स्वप्न रंगवले असतात माहेरच्या अंगणात पायरीवर बसून…
तिच्या हास्याची… तिच्या आसवांची… साक्षीदार असते ही माहेरची पायरी!!
आजही आईसह, माहेरवाशिणीची आतुरतेने वाट पहात असते ही पायरी!!
इमारतीच्या जिन्याच्या पायरीवर जाता येता तरुण तरुणीच्या प्रेमाच्या संकेताची देवाण – घेवाण करत प्रेम कथाही रंगतात… त्यांच्या प्रेमाची साक्ष असतात या पायऱ्या!!
मैत्रिणींचे कित्येक गुपितं एकमेकींना सांगितल्या जातात याच पायऱ्यांच्या साक्षीने… कधी पाय न घसरू देता… नव्या नवरीला कडेवर घेऊन तो दादला भंडारा उधळत जेजुरीला येळकोटाच्या पायऱ्या चढतो… दमानं रं बाबा!
जय मल्हार म्हणत माथा टेकतो…
धन्य धन्य!!
देवाच्या दर्शनासाठी उंच गडावरच्या पायऱ्या कितीही असो… भक्त पार करून जातो. गावामध्ये मोठ्या विहिरी असतात… आत पाण्यापर्यंत उतरायला दगडी पायऱ्या असतात… जसं खाली खाली उतरत जावं… गूढ वाढत जातं… बंधाऱ्याचं पाणी पायरी वरून उड्या मारत खाली येतं… अवखळ बालकासारखं! देवानंद नूतनचं गाणं आठवतं का…. दिल का भंवर करे पुकार…
कुतुब मिनारच्या अख्ख्या पायऱ्या उतरत गाणं सुरु होतं… ते शेवटच्या पायरी पर्यंत… कुठेही आउट डोअर शूटिंग नाही पण तरीही गाणं सुपर डुपर हिट… कमाल पायरी का और इस जोडी का… आयुष्य हे पायऱ्या पायऱ्यांचं असतं… कधी चढ… कधी उतार… फक्त तोल संभाळायचा असतो… अनेक कडू गोड आठवणींचा अनुभव आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर येतो. ‘ तुझ्या घराची पायरी कधी चढणार नाही ‘ हे वाक्य आयुष्यभर दुःख देतं…’ या घराची पायरी कधी चढू नको ‘ हे शब्द सुद्धा काळीज चिरून टाकतात.
कोणाच्याही आयुष्यात असं ऐकायला लागू नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना… आणि हे ही तितकंच खरं कि, शहाण्या माणसांने कोर्टाची पायरी कधी चढू नये… आयुष्याचं एक गुपित असतं… आंब्यासारखं… हापूस असो कि पायरी… त्याचा गोडवा मानण्यावर आहे… आणि पायरीवर बसून खाल्ला तर गोडी अधिकच वाढते… या मग, पायरीवर गप्पा मारायला…