Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा...’

‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शक्तीपद राजगुरू यांच्या ‘नया बसत’ या कादंबरीवर आधारित ‘अमानुष’(१९७५) हा शक्ती सामंता यांनी हिंदी आणि बंगालीत काढलेला सिनेमा. त्याचे सगळे चित्रीकरण दुर्दैवाने अलीकडेच कुख्यात झालेल्या संदेशखालीत झाले होते. अर्थात तेव्हा हल्ली इतके बांगलादेशी अतिक्रमण झालेले नव्हते आणि सरकारही वेगळे होते. त्यावेळी काँग्रेसचे स्व. सिद्धार्थ शंकर रे बंगालचे मुख्यमंत्री होते. तेव्हा संदेशखाली हे कोळी लोकांचे एक शांत गाव होते.

‘अमानुष’ची कथा साधीसरळ होती. बंगालमधील सुंदरबनच्या एका मासेमारी करणाऱ्या खेड्यात मधुसूदन रॉय चौधरी हा जमीनदार कुटुंबातील युवक राहत असतो. तो जरी जमीनदार असला, तरी मनाने अगदी सच्चा असलेला मधू खरे तर देवमाणूस असतो. मात्र अतिशय लोभी असलेला त्याचा कारस्थानी दिवाणजी माहीम घोषाल (उत्पल दत्त) त्याला पूर्णपणे फसवून, अक्षरश: रस्त्यावर आणतो.

एरवी ‘गोलमाल’, ‘गुड्डी’ ,‘नरम गरम’ व ‘रंगबिरंगी’सारख्या चित्रपटातील नर्मविनोदी लोभस भूमिकांमुळे प्रेक्षकात अतिशय लोकप्रिय झालेल्या उत्पल दत्तांनी ‘अमानुष’मध्ये एक विक्रमच केला होता. त्यांनी अतिशय चतुर आणि क्रूर खलनायकाची भूमिका अतिशय कसदार अभिनयाने अशी जिवंत केली होती की, सिनेमा पाहताना आपल्याला त्यांचा अनावर राग येत राहतो.

ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्याकडूनच फसवले गेल्यामुळे, मधुसूदन रॉय चौधरी मनातून प्रचंड वैफल्यग्रस्त होते. मग खचलेला, भावनिक स्वभावाचे मधू दारूच्या आहारी जातो, तरीही गावातील गोरगरिबांच्या अडचणी न पाहावल्यामुळे, तो त्यांच्या समस्यांसाठी स्थानिक प्रशासनाशी भांडतही असतो. त्याचे रेखावर (शर्मिला टागोर) निस्सीम प्रेम आहे. मात्र मधूच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांचे संबंध बिघडते आणि त्या दु:खाने तो व्यसनाच्या अधिकच आहारी जातो, अशी ‘अमानुष’ची सरधोपट कथा होती. मात्र मानवी मनाचे अनेक नाजूक धागे, त्यांची गुंतागुंत, चढ-उतार हे सर्व सिनेमातील सर्वच दिग्गज कलाकारांनी सहज अभिनयाने सुंदरपणे दाखवले. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांनी, समीक्षकांनी उचलून धरला. सिनेमावर पुरस्कारांची बरसात झाली.

फिल्मफेयरचे अभिनयाचे विशेष पारितोषिक उत्तमकुमार यांना, सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेयर इंदीवर यांना, सर्वोत्कृष्ट गायकाचे फिल्मफेयर किशोरदांना मिळाले. याशिवाय सिनेमाला फिल्मफेयरची सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (दोन्ही शक्ती सामंता यांना), सर्वोत्कृष्ट अभिनेता (उत्तमकुमार), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (प्रेमा नारायण) सर्वोत्कृष्ट गायिका (आशा भोसले) अशी एकूण ५ नामांकने मिळाली होती. उत्तमकुमार यांना बंगाल फिल्म पत्रकार संघटनेचे सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. फिल्मफेयरचे पूर्वेकडील चित्रपटांसाठी असलेले सर्वोत्कृष्ट सिनेमाचे आणि उत्तमकुमार यांना पूर्वेकडील सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिकही मिळाले.

बंगालीत तोपर्यंत ‘अमानुष’इतके उत्पन्न कोणत्याच सिनेमाला मिळाले नव्हते. हिंदीतही तो ‘सिल्व्हर ज्युबिली’ ठरला. बंगळूरुच्या ‘स्वप्ना’ थियेटरमध्ये तर तो तब्बल सव्वा वर्षापेक्षा अधिक दिवस चालला होता. सिनेमाच्या यशामुळे त्याचा रीमेक तेलुगूमध्ये ‘एदुरिता’(१९७७) या नावाने निघाला आणि उत्तमकुमारची भूमिका केली खुद्द एन. टी. रामाराव यांनी! तमिळ रीमेक आला ‘त्यागम’ या नावाने. त्यात होते प्रसिद्ध तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन! याशिवाय ‘इथा ओरू मनुष्यन’ नावाने १९७८लाच मल्याळम् रीमेकही येऊन गेला.

इंदीवर यांना ज्या गाण्यामुळे फिल्मफेयर मिळाले, ते गाणे हीच सिनेमाची थीम होती. किशोरदांनी सुप्रसिद्ध बंगाली संगीतकार श्यामल मित्रा यांचा दिग्दर्शनात गाऊन अजरामर केलेल्या त्या गाण्याचे शब्द होते की,
“दिल ऐसा किसीने मेरा तोड़ा,
बर्बादीकी तरफ ऐसा मोड़ा.
एक भले मानुषको,
अमानुष बनाके छोड़ा.”

अनेकदा थोडी जास्त भावनिक असलेली माणसे एखादा मानसिक धक्का बसल्यावर मनाने लगेच कोसळतात. त्यांचा केवळ जगावरचाच नाही, तर स्वत:वरचाही विश्वास उडतो. ती अनपेक्षितपणे पदरी आलेल्या अपयशाने वैफल्यात वाहवत जातात. त्या व्यक्तीला कित्येकदा आपल्या वाताहतीचे कारण कळत असते, कोण दोषी आहे, हेही माहीत असते. पण मनाच्या हळवेपणामुळे सत्य स्वीकारून, स्वत:ला सावरता येत नाही. अशा वेळी तो व्यसनाच्या आहारी जातो. मधूचे तेच झालेले असते.

तो जे ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’ म्हणतोय, ते केवळ रेखाविषयी नाही. ते महीम घोषालबद्दलही आहे. तो व्यसनाच्या इतका आहारी गेला आहे की, स्वत:बद्दलच त्याला दया वाटू लागते. तो म्हणतो, या लोकांनी एका भल्या माणसाला अमानुष बनवून टाकले. म्हणजे परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची त्याची क्षमता शाबूत आहे. मात्र परिस्थितीशी सामना करून, चित्र बदलण्याची इच्छाशक्ती संपली आहे. असंख्य व्यसनी लोकांची हीच समस्या असते. त्यांना व्यसनातच आधार शोधावासा वाटतो आणि ते आयुष्याची वाताहत करून घेतात.

आपण दारूसारख्या भयंकर व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे, फार दिवस टिकणार नाही, याची जाणीव झाल्याने तो म्हणतो, “जीवनाची आसक्ती मोठी आहे. पण आता जीवनच थोडे उरले आहे. माझ्यासमोर सागर खळाळतो आहे. पण माझी तहान अतृप्तच राहणार आहे.”
सागर कितना मेरे पास है,
मेरे जीवन में फिर भी प्यास है.
है प्यास बड़ी जीवन थोड़ा,
अमानुष बना…

आपल्या अगतिकतेमुळे आपल्यासमोर जीवनाचे काही ध्येय शिल्लक राहिलेले नाही, याची वेदनादायक जाणीवही त्याला अस्वस्थ करते. आपल्या नशिबी आता केवळ अपयशच लिहिले गेलेले आहे आणि त्यामुळेच आपण असे झालो आहोत, असे म्हणून तो सर्व दोष इतरांना देऊन, स्वत:ची सुटका करून घेऊ इच्छितो.
कहते है ये दुनियाके रास्ते,
कोई मंज़िल नहीं तेरे वास्ते.
नाकामियोंसे नाता मेरा जोड़ा,
अमानुष बनाकर छोडा…

गीतकार सहसा प्रेयसीला चंद्राची उपमा देतात. इथे प्रथमच कवीने तिला सूर्याची उपमा दिल्यासारखे वाटते. एकटेपणामुळे अतिशय खिन्न झालेला मधू म्हणतो की, रोज सूर्य बुडतो, हे खरे असले, तरी तो रोज उगवतोही आणि सूर्य उगवला की, सगळा अंधार निघून जातो हेही सत्य आहे. मात्र माझ्या आयुष्यातला सूर्य, माझी प्रिया, माझा आधार माझ्यावर असा रुसला आहे की, त्यानंतर पुन्हा माझ्या भावविश्वात सकाळ झालीच नाही! आता अंधारच अंधार घेरून उरला आहे. जिने माझ्या जीवनात प्रकाश, आनंद, उत्साह आणला होता, तिनेच माझी साथ कायमची सोडली आहे. आता कसला सूर्योदय?
डूबा सूरज फिरसे निकले,
रहता नहीं है अँधेरा.
मेरा सूरज ऐसा रूठा, देखा न मैंने सवेरा.
उजालोंने साथ मेरा छोड़ा,
अमानुष बनाकर छोडा…

एके काळी साहित्य आणि राजकारण या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि बंगाल संपूर्ण देशाचे नेतृत्व करत होते. तेव्हाच्या बंगाली साहित्यावर हिंदीत अनेक सिनेमा निघत असत. ‘मेरा साया’सारखे हिंदी सिनेमे, तर चक्क मराठीचे रीमेक होते. आता मात्र दोघांत शिल्लक आहे, फक्त उज्ज्वल भूतकाळ. हाच एकमेव धागा. वर्तमानाचे तर बोलायचेच नाही, कारण आपला विषयच आहे ‘नॉस्टॅल्जिया!’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -