Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलChild story : गोष्ट एका वाढदिवसाची!

Child story : गोष्ट एका वाढदिवसाची!

  • कथा : रमेश तांबे

कोणताही भेदभाव न करता सर्वाना आपल्या आनंदात सामील करून घेतल्याने आपला आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे एकजुटीने राहून मैत्रीची भावना जपणे हेच सुख आहे.

अथर्वचा आज वाढदिवस होता. त्याच्या आई-बाबांनी वाढदिवसानिमित्त एक छोटेखानी पार्टी आयोजित केली होती. अथर्वचे सर्व मित्र पार्टीला येणार होते. त्याशिवाय अथर्वचे मामा-मामी, काका-काकू, आत्या-मामा अशा अनेकांना आमंत्रण दिले होते. संध्याकाळी ७ वाजता साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू होती. अथर्व आज १३ वर्षांचा झाला होता. शिवाय तो शिष्यवृत्ती परीक्षेतही महाराष्ट्रात पहिला आला होता.

अथर्व खूपच खूश होता. आनंद त्याच्या चेहऱ्यावर नुसता ओसंडून वाहत होता. येणाऱ्या प्रत्येक मित्राच्या शुभेच्छा तो स्वीकारत होता. त्याने काळ्या रंगाचा छान सूट घातला होता. त्यामुळे अथर्व अगदी राजबिंडा दिसत होता. अथर्वने सर्व वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. नंतर त्याची नजर सर्व हॉलभर प्रसन्न मुद्रेने फिरत होती. तितक्यात त्याची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या दोन काळ्या-सावळ्या मुलांवर पडली. त्याच्याच वयाचा मुलगा आणि त्यांच्यापेक्षा थोडी लहान मुलगी.

त्यांना बघताच अथर्वसमोर प्रश्न उभा राहिला. अरे हे कोण? यांना आपण कधीच पाहिलं नाही! त्यांना कोणी बोलवलं? कुणाच्या आमंत्रणावरून ते इथे आले आहेत? तसा अथर्व त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोण रे? इथे कुठून आलात?” ती मुलं काही न बोलता उभी होती. अथर्वचे सर्व मित्र दूरून, हा प्रसंग बघत होते. अथर्वचे आई-बाबादेखील मोठ्या कुतूहलाने त्याच्याकडे बघत होते. तितक्यात मुलगी म्हणाली, “दादा मी आकृती आणि हा माझा दादा सचिन. तुमच्याकडेच घरकाम करायला माझी आई येते. तीच आम्हाला इथे घेऊन आली आहे.”

एवढ्या मोठ्या पार्टीत एका घरकाम करणाऱ्या बाईंनी आपल्या मुलांना का आणावं, असा प्रश्न अथर्वच्या मित्रांना पडला. आता अथर्व नेमकं काय करणार, हे त्याच्या आई-बाबांना पाहायचं होतं आणि त्याच्या मित्रांनाही! मग त्या दोन मुलांना सोडून, तो थेट स्टेजवर गेला आणि बोलू लागला. पार्टीत आलेल्या सर्व मित्रांचे आणि मोठ्यांचे त्यांनी आभार मानले. अथर्व सांगू लागला. अनेक वर्षे आमच्या घरी मीनाताई घरकामाला येतात. आमच्या घराची सर्व जबाबदारी आपलेपणाने पार पडतात. एक दिवस जरी मीनाताई आली नाही, तर आई लगेच काळजीत पडते. एवढी वर्षं त्या आमच्याकडे घरकाम करतात; पण त्या राहतात कुठे? त्यांची मुलं काय करतात? हे मला माहीत नव्हतं; पण आज त्यांची सचिन आणि आकृती ही दोन्ही मुलं माझ्या वाढदिवसाला हजर आहेत. याचा मला खूप आनंद वाटतो. मग एवढे बोलून तो दोघांचाही हात धरून, त्यांना स्टेजवर घेऊन गेला अन् साऱ्यांना आश्चर्य वाटावे असं घडले. अथर्वने सचिन आणि आकृतीच्या सोबतीने वाढदिवसाचा केक कापला. अथर्वने प्रथम तो सचिन आणि आकृती यांना भरवला. तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा नुसता कडकडाट केला. जो तो अथर्वची प्रशंसा करू लागला. अथर्वच्या मित्रांनी, काका-मामांनी आणलेल्या सर्व भेटवस्तू आकृतीला देत म्हणाला की, “या सर्व भेटवस्तू तुझ्या बरं का! आणि हो त्यातल्या काही दादालाही दे!” अथर्वची ही कृती आणि विचार ऐकून अथर्वच्या आई-वडिलांचे डोळे भरून आले आणि त्यांना आपल्या मुलाचा मोठा अभिमान वाटला. मग अथर्व आपल्या आई-बाबांजवळ आला आणि म्हणाला, “आई मी केलं ते योग्य आहे ना!” अथर्वने असं विचारताच, आईने त्याला पटकन पोटाशी धरलं अन् त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, “होय रे बाळा, कुठं शिकलास हे सारं!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -