Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमतदान जनजागृती काळाची गरज

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे

दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला तुम्ही भुलू नका. या वाक्याचा आशय १८व्या लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करताना मतदार राजाने समजून घ्यावा. कारण बाबासाहेबांनी त्यावेळी मतदार राजाला सांगितले होते की, तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्यांइतके कंगाल कोणीच नसेल.

तेव्हा प्रत्येक मतदार राजाला भारतीय राज्यघटनेने मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिलेला आहे तो निर्भीडपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करीन असा संकल्प केला पाहिजे. तसेच, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताला सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मतदान हे नागरिकत्वासाठी आवश्यक आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी मतदान हे राजकीय शिक्षणाचे साधन आहे हा बाबासाहेबांचा युक्तिवाद भारताच्या मतदानाच्या हक्कासाठी महत्त्वाचा आहे.

भारत देशात १८व्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली असून देशात ५४३ मतदारसंघ आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात ४८ मतदारसंघांत पाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी १९ व २६ एप्रिल रोजी मतदान झालेले आहे. आता ७ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्गसह ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर १३ मे व शेवटी २० मे रोजी मतदान होईल. त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती केली जात आहे; परंतु आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात दोन टप्प्यांत मतदान झालेले आहे. मात्र एकाही मतदार संघात १०० टक्के मतदान झालेले नाही, अशी आकडेवारी सांगते. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात अनुक्रमे रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान गडचिरोली, चिमूर मतदारसंघामध्ये ६४.९५ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान नागपूर मतदारसंघामध्ये ४७.९१ टक्के झाले.

राज्यातील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याचा विचार करता अनुक्रमे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांत सरासरी ५३.७१ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान वर्धा मतदारसंघात ५६.६६ टक्के झाले असून सर्वात कमी मतदान नांदेड मतदारसंघात ५३.५३ टक्के झाले आहे. असे का? याचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा पुढील मतदारसंघात मतदारांच्या मतांचा टक्का कसा वाढू शकतो याचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी मतदान जनजागृती एक काळाची गरज आहे.

सध्या सत्ताधारी व विरोधक जीवाचे रान करून कडक उन्हातान्हात लोकसभेच्या प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी आपण विकास कसा केला आणि पुढे कसा करणार आहोत याचा प्रचार करीत आहेत, तर विरोधक आपल्याला निवडून दिल्यास आपण विकास कसा साधू शकतो हे विकासाचे नवीन मॉडेल मतदारांना सांगत आहेत. याचे उत्तर ४ जून रोजी मिळेल. काही ठिकाणी ‘माझे मत माझे भविष्य’ व ‘एका मताचे सामर्थ्य’ अशा विविध स्पर्धा आयोजित करून मतदार राजाला जागृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये गीत-गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हीडिओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र मतदार राजा खुल्या मनाने मतदान करायला जात नाही हे राज्यातील दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव मतदार राजाला करून द्यावी. आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील मतदार झालेल्या किंवा परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी जागृत करावे. ते सुद्धा आपल्या मतदारसंघात केव्हा मतदान आहे त्याची तारीख व वेळ सांगावी. त्याचबरोबर मतदान करताना मतदार ओळखपत्र न विसरता घेऊन जावे. जर मतदान ओळखपत्र नसेल तरी मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, फोटो असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे नाव मतदान यादीत असायला हवे.

आजही काही गावांमध्ये मतदानावर बहिष्कार घातला जातो हे पाहायला मिळते. त्यासाठी त्या गावच्या समस्या कोणत्या आहेत त्या जाणून योग्य तोडगा प्रशासनाला काढता आला पाहिजे. त्या आधी त्या गावाला निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची वेळ का आली? याचे उत्तर शोधावे लागेल. त्यासाठी नि:पक्षपातीपणे प्रशासनाला काम करावे लागेल. तेव्हा मी मतदार आहे, तेव्हा मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे प्रत्येक मतदारसंघांतील मतदाराला मतदान करण्यास प्रोत्साहित करावे. तरच मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. तेव्हा मतदाराने निर्भयपणे मतदान करण्याचा निश्चय करावा. त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करावे, तर खऱ्या अर्थाने मतदान जनजागृती होऊन मतदार राजा आनंदाने मतदान करेल. त्यासाठी भारतीय निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरी गावातील विकासकामे होणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -