कणकवली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी सभेदरम्यान राज ठाकरे यांनी नारायण राणेंनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
नारायण राणे यांना मु्ख्यमंत्री म्हणून ६ महिने काम करायला मिळाले. मात्र जर त्यांना पाच वर्षे मिळाली असती तर आज इथे प्रचाराला कोणाला यायची गरज नसते. अशा शब्दात राज ठाकरेंनी नारायण राणेंचे कौतुक केले. कणकवली येथे राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा बोलावली होती.
यावेळी सभेत बोलताना त्यांनी राणे मुख्यमंत्री असतानाचा किस्साही सांगितला,ते म्हणाले जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला वाटले होते की यांना हे सगळं जमेल का? मात्र त्यांनी जे काही केले ते अनेकांनाही जमले नाही.
यावेळी त्यांनी कुपोषणाचा मुद्दा नारायण राणे यांनी सभागृहात कसा खणखणीतपणे मांडला होता. याचे उदाहरणही दिले. राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिरोदे अभय बंग यांना घेऊन राणेंकडे गेले होते. यावेळी कुपोषणाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा झाली. नारायण राणे यांनी सर्व काही ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात त्यांनी हा विषय खणखणीतपणे मांडला. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, तसेच तो मांडणे हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे.