तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली
मुंबई : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली आहे. आज दिवसभरातच तीन मोठ्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. अकोला (Akola) येथे आज आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात होऊन पाच जण मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर आता जळगाव (Jalgaon) व छत्रपती संभाजीनगरमध्येही (Chhatrapati Sambhajinagar) अपघात झाला आहे. जळगाव येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे.
शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळली. यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात घडला. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतीरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बस उलटली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते रावेर या मार्गावरुन ही बस धावत होती. मात्र, अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला. या बसमधून ६६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ७ ते ८ जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बस रस्त्यावरुन खाली घसरल्याने पलटी होवून बसचेही मोठे नुकसान झाले. बसच्या पुढील व पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या असून टायरही निखळले आहे.