मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय
मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो बजावला गेलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये (Democracy) प्रत्येक मत हे अमूल्य असते. मात्र, अनेकदा मतदानाचा हक्क नागरिक बजावताना दिसत नाहीत. काही वेळेस कमी जनजागृती याचं कारण असू शकते. पण त्याचसोबत काहीजण मतदान केंद्रापर्यंत जाण्याचाही कंटाळा करतात. प्रवासाचा कंटाळा करतात. यामुळे त्यांचं अमूल्य मत वाया जातं. असं होऊ नये म्हणून महामुंबई मेट्रो प्रशासनाने (Maha Mumbai Metro Operation Corporation Limited) मतदानाच्या दिवशी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी प्रवाशांना तिकीटावर १०% सवलत मिळणार आहे.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना २० मे, २०२४ रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे.
ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना केंद्रापर्यंत आरामदायक प्रवासही करता येणार आहे.