दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट
नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) हे मागील १० दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण यांच्या वडिलांनी ते हरवल्याची तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi police) त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून हा शोध सुरू असताना दुसरीकडे हे षड्यंत्र आहे की घातपात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुचरण सिंह हे २२ एप्रिलपासून दिल्ली विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी आपला मोबाईल फोन हा पालम परिसरात सोडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजनुसार, गुरुचरण सिंह हे एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात बसताना दिसले आहेत. सर्व काही पूर्वनियोजित प्लान आखून त्यांनी दिल्ली सोडली असल्याचा संशय पोलिसांना असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुरुचरण सिंह यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध तपास पथके नियुक्त केली आहेत. त्यातील एक पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी गुरुचरण सिंह यांच्याबाबत कलाकारांकडे चौकशी केली. गुरुचरण सिंह यांच्याबाबत अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुरुचरण सिंह शेवटचे कधी दिसले होते?
२२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे अखेरचे दिसले होते. चार दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांमध्ये दाखल असलेल्या तक्रारीनुसार, २२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे सकाळी ८:३० वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाले. पण, ते मुंबईला पोहोचले नाही आणि घरीही परतले नाही. शिवाय त्यांचा फोनही लागत नाही. गुरुचरण सिंह हे मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.