Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीBaramati Loksabha : खर्चाच्या तफावतीवरून सुनेत्रा पवारांसह सुप्रिया सुळेंना नोटीस

Baramati Loksabha : खर्चाच्या तफावतीवरून सुनेत्रा पवारांसह सुप्रिया सुळेंना नोटीस

सादर केलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी केली तुलना

पुणे : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान या नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांकडून आलेला खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनाला देखील समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी १ मे रोजी झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंत एकूण खर्च ३७ लाख २३ हजार ६१० इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार व सुळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही तफावत दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी अमान्य केली आहे.

दोन दिवसांत उत्तर द्या

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिशीनुसार याबाबतचा खुलासा पुढील ४८ तासांत देण्याचे सांगण्यात आले आहे. खुलासा न आल्यास ही तफावत मान्य असल्याचे समजून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -