Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Delhi Commission for Women : दिल्ली महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन!

Delhi Commission for Women : दिल्ली महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन!

आयोगाच्या माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राज्यपालांनी दिले निलंबनाचे आदेश


नवी दिल्ली : दिल्लीच्या महिला आयोगातून (Delhi Commission for Women) एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीचे राज्यपाल व्ही.के.सक्सेना (V. K. Saxena) यांनी महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या कार्यकाळात त्यांनी २२३ महिलांची नियुक्ती नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता केली होती, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर नायब राज्यपालांनी २०१७ मध्ये महिला आयोगाच्या बेकायदेशीर नियुक्ती आणि अनियमिततेच्या मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली.


समितीने २ जून २०१७ रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे आणि नायब राज्यपालांचीही मंजुरी न घेतल्यामुळे निर्माण केलेली २२३ पदे आणि महिला आयोगाद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनियमित होती. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने डीसीडब्ल्यू नियम तरतुदींचे उल्लंघन केले, असा आरोप करण्यात आला.


डीसीडब्ल्यूने केलेल्या या सर्व अनियमितता आणि बेकायदेशीरतेची दखल घेऊन नायब राज्यपालांनी नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मंजूर पदांशिवाय आणि योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याने रद्दबात ठरवले.

Comments
Add Comment