Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू...

Nitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू नयेत!

आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला

उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात : नितेश राणे

कणकवली : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडतात. मात्र, तरीही त्यांची टिकाटिप्पणी सुरु असते. अशातच आता त्यांनी थेट निवडणूक आयोगावर (Election Commission) संशय व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच धारेवर धरले. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ‘निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार त्याला आहे का?’ असा बोचरा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

नितेश राणे म्हणाले, प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या दृष्टीने पाहणं ही आता संजय राजाराम राऊतची जुनी सवय झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरुन आज सकाळी तो उगाच आपल्या अकलेचे तारे तोडत होता. यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागावं, अशी यांची इच्छा. म्हणजे निवडणूक आयोगाने एवढेच टक्के का दिले? एवढंच मतदान का दाखवलं? आता स्वतः साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही. मतदार कसे वागतात? ते सकाळी किती वाजता मतदानासाठी निघतात, याचा त्याला थांगपत्ता नाही आणि असा माणूस निवडणूक आयोगाला सल्ले देतोय की एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला? हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार त्याला आहे का?

पुढे नितेश राणे म्हणाले, नाहीतर मग आम्हीही प्रश्न विचारायचा का की, महाविकास आघाडीच्या काळात जो दिशा सालियनचा खून झाला तिच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा योग्य वेळी का आला नाही? आतापर्यंत तो कोणाच्याही हातात का नाही? मग प्रत्येक गोष्टीवर जर संशय घ्यायचा असेल तर दिशा सालियनच्या फायनल पोस्टमार्टमवर पण प्रश्न उपस्थित केला पाहिजे. म्हणून उगाच अकलेचे तारे तोडू नको, असा सल्ला नितेश राणे यांनी राऊतांना दिला.

संजय राऊत चायनीज मॉडेल फटाका

फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याचा आणि फुसकाबार बोलण्याचा अधिकार या चायनीज फटाक्याला आहे का? स्वतः चायनीज मॉडेल फटाक्यांसारखा फुटायचा बंद झाला आहे. वात पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून असा फार मोठा प्रश्न संजय राऊतला बघितल्यानंतर समोर उभा राहतो. त्यामुळे फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस, असं नितेश राणे म्हणाले.

उद्धवचा खरा चेहरा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला दाखवला

जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला त्यातून एकच सिद्ध होतं की, उद्धव ठाकरे हा अत्यंत नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि दुसर्‍या बाजूला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनायला जात होते तेव्हा फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की तुम्ही मुख्यमंत्री बना मी समर्थन देतो. म्हणजे उद्धव ठाकरेचं शिवसैनिकांवर किती प्रेम आहे, आणि तो किती स्वार्थी आणि नीच आहे याचं उत्तम उदाहरण, त्याचा खरा चेहरा फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवला, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

आम्हाला शिव्याशाप द्या आणि आमचं मताधिक्य वाढवा

उद्धव ठाकरे कणकवलीत येऊन सभा घेण्याची आम्ही वाट बघतोय, कारण जेव्हा इथे येऊन सभा घेतात तेव्हा आमचा विजय निश्चित होतो, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला. ते म्हणाले, २०१९ ला त्यांनी कणकवलीत सभा घेतली आणि तेव्हा माझं मताधिक्य वाढलं. त्यामुळे कितीही ऊन असलं, त्रास होत असला तरीही तुम्ही इथे या, हवं तर माझ्या खर्चाने मी हेलिकॉप्टर पाठवतो, पण कणकवलीत येऊन तुमच्या स्टाईलने भाषण करा, आम्हाला शिव्याशाप द्या आणि आमचं मताधिक्य वाढवा, असं नितेश राणे खोचकपणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -