Friday, May 9, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Dnyaneshwari : दीपस्तंभ

Dnyaneshwari : दीपस्तंभ

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


ज्ञानदेवांची ओव्यांमधून समजावण्याची रीत अप्रतिम आहे. हे आपल्याला अध्यायातून समजतेच. ज्ञानदेवांनी अठराव्या अध्यायात सत्व, रज आणि तम या तीन गुणांचं वर्णन ओव्यांमधून केले आहे. त्यामुळे संसाररूपी सागरात गटांगळ्या न खाता, तरून जाण्यासाठी या ओव्या जणू 'दीपस्तंभ'च आहेत असे वाटतात.


ज्ञानदेवांची समजावण्याची रीत अप्रतिम! त्याविषयी काय आणि किती सांगावं? ज्ञानेश्वरीत जागोजागी आपल्याला याचा अनुभव येतो. यातही अठरावा अध्याय म्हणजे अध्यायांचा कळसच होय. यातील काही सुंदर ओव्या आज पाहूया.



सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचं वर्णन यात येतं. यावरून सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे कर्ते होतात. या प्रत्येकाचं स्पष्टीकरण करताना माउली अतिशय नेमके, सोपे दृष्टान्त देतात. त्यामुळे तो भाग अगदी सुस्पष्ट होतो. आता तामस कर्त्याचं वर्णन पाहूया.



‘आपल्या स्पर्शामुळे समोर येणारे जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही.’ ओवी क्र. ६६३
‘अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो हे जसे शस्त्राला समजत नाही किंवा आपल्यायोगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकूट विषाला समजत नाही.’ ओवी क्र. ६६४



‘तसा, हे धनंजया, ज्या क्रियेने आपला आणि दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो..’ ओवी क्र. ६६५



किती सार्थ दाखले आहेत हे! अग्नी हे एक मोठं महत्त्वाचं तत्त्व, एक मोठी शक्ती आहे. पण या अग्नीच्या ठिकाणी हा विचार नसतो की समोर कोण आहे किंवा काय आहे! जी गोष्ट समोर येईल त्याला जाळणं हेच त्याचं कार्य. हा अग्नी दाहक, दुसऱ्याचा जीव घेणारा. तर दुसरा दाखला शस्त्राचा. शस्त्राच्या ठिकाणी भयंकर धार, तीक्ष्णता असते. त्यामुळे दुसऱ्याचा जीव जातो. परंतु शस्त्राला त्याचं काही सोयरसुतक नसतं. याचं दाहक, धारदार वर्गात समावेश करता येईल अशी गोष्ट म्हणजे काळकूट विष होय. हे काळकूट म्हणजे महाभयंकर विष ते दुसऱ्याचा नाश करतं.



या तिन्ही गोष्टींत साम्य कोणतं? तर या सगळ्या गोष्टी घातक आहेत. दुसऱ्याचा घात करताना त्यांना त्याचं काहीएक देणंघेणं नसतं. या सर्वांप्रमाणे तामस कर्ता असतो.



तो आपला आणि दुसऱ्याचा नाश होईल अशा क्रिया करण्यास प्रवृत्त होणारा असतो. यातून तामस कर्त्याची दुष्ट, दाहक प्रवृत्ती ज्ञानदेव किती नेमकेपणाने चितारतात!



पुढे ते याचं अजून स्पष्टीकरण देतात. ‘ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्म करतेवेळी, यात काय लाभ झाला याची जो काळजी बाळगत नाही.’
ही ओवी अशी –
‘तिया करितांही वेळीं।
काय जालें हें न सांभाळी।
चळला वायु वाहटुळीं ।
चेष्टे तैसा।’ ओवी क्र. ६६६



वावटळ म्हणजे मोठे वादळ होय. त्यावेळी बेबंदपणे वाहणारा वारा असतो. तामस कर्त्याची वागणूक अशी बेबंद असते, अविचारी असते. वावटळीमुळे अनेक जीवांचं, घरांचं नुकसान होतं. त्याप्रमाणे तामस कर्त्याच्या वर्तनाने अनेकांना त्रास होतो. वस्तुतः माणूस म्हणून जन्माला आल्यावर स्वतःचं आणि इतरांचं कल्याण व्हावं हा हेतू असायला हवा; पण तामस कर्ता इतरांचं कल्याण राहिलं बाजूला, हानीच करत असतो.



अशा प्रवृत्तीचं नेमकं चित्र रेखाटून माउली आपल्याला मार्ग दाखवतात. कोणता मार्ग? की हा रस्ता टाळायचा आहे. त्यात हे धोके आहेत. त्यामुळे आपल्याला माउलींच्या या ओव्या म्हणजे जणू ‘दीपस्तंभ’ वाटतात. संसाररूपी सागरात गटांगळ्या न खाता तरून जाण्यासाठी दिशा देतात. माउलींचे आपल्यावर केवढे हे उपकार! त्यासाठी आपण त्यांचे सदा ऋणी राहू.



manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment