Sunday, March 23, 2025
Homeदेश"भारत जोडो यात्रेचा समारोप ४ जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"

“भारत जोडो यात्रेचा समारोप ४ जूनला काँग्रेस ‘ढूंढो’ यात्रेने होईल”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात

बरेली : काँग्रेस पक्षाचे ‘राजपुत्र’ राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’ने निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती, परंतु त्याचा समारोप हा येत्या ४ जून रोजी ‘काँग्रेस ढूंढो यात्रे’ने होईल,अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

बरेलीमधून भाजपाचे उमेदवार छत्रपाल गंगवार यांच्या समर्थनार्थ गुरूवारी आयोजित जाहीर सभेला शाह यांनी संबोधित केले. “आमच्यासमोर ही घमंडीया आघाडी निवडणूक लढवत आहे. त्यांचे राजपुत्र राहुलबाबा यांनी भारत जोडो यात्रेने निवडणुकीची सुरुवात केली. पण आज मी बरेलीला सांगून जात आहे की त्यांची सुरुवात ‘भारत जोडो’ यात्रेने झाली होती पण ४ जूननंतर तिचा ‘काँग्रेस ढूंढो’ यात्रेने समारोप होणार आहे. दोन टप्प्यातील निवडणुकीत काँग्रेस दुर्बिणीतूनही दिसत नाही आणि नरेंद्र मोदी शतक ठोकून ४००च्या शर्यतीत खूप पुढे गेले आहेत” असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

“ही निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार आहे. ही निवडणूक आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याची निवडणूक आहे” असे शाह म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा संदर्भ देत गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, “७० वर्षांपासून काँग्रेस पक्ष राम मंदिराचा मुद्दा रखडवत होतं, पुढे ढकलत होते. तुम्ही नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले, त्यानंतर पाच वर्षांतच मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केले आणि २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जय श्री रामचा जयघोष केला.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत अमित शाह म्हणाले की, “अखिलेशजी यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि सोनियाजी यांना त्यांचा मुलगा राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. जे आपल्या मुलाला, मुलीला, पत्नीला, भावाला, पुतण्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बनवण्यासाठी राजकारणात आहे, ते बरेलीच्या तरुणांचं भलं कसं करू शकतात? गरीब कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदीच त्यांचं भलं करू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -