मनसे नेते अमेय खोपकरांची टीका
मुंबई : मुंबईतील राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आले आहेत. १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच येथे सभा घेण्याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.
मागच्या सभेत राज ठाकरेंनी मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही, असे सांगितले होते. मात्र आता लोकसभेचा उमेदवार नसताना कुणाची पोरं कडेवर खेळवणार आहात? असा सवाल ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी विचारला होता.
त्याला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तालावर नाचकाम करणाऱ्या लोकांना शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळत नसेल तर त्यामध्ये राजसाहेबांना आणायची काहीच गरज नाही. तुम्हाला नाचता येत नाही हे कबूल करा, अंगण वाकडे म्हणून उगाच भोकाड पसरू नका, असा टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे.