महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिकच्या जागेवरुन (Nashik Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपा (BJP) हे तिन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केले. त्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नाशिक येथे महायुतीच्या एकत्र पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शिवसेनेकडून आज सकाळीच ठाणे व कल्याण या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकचा प्रश्न सुटला नव्हता. आज पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबतही महायुतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवार करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचा सत्कार केला.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.