अमेरिकेत गोळ्या झाडून केली हत्या
वॉशिंग्टन : गुन्हेगारी जगतातील मोठं नाव आणि दहशतवादी गोल्डी ब्रारची (Goldy Brar) अमेरिकेत (USA) गोळ्या झाडून हत्या (Shot Dead) करण्यात आली आहे. डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Siddhu Moosewala) हत्येनंतर गोल्डीचे नाव मीडियात चर्चेत आले. मात्र, याआधीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. गोल्डी ब्रारला भारत सरकारने दहशतवादी घोषित केलं आहे.
कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोल्डी ब्रार हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांना तसेच इतर राज्यांच्या पोलिसांना हवा होता. काही महिन्यांपूर्वीच गोल्डी ब्रारला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं. मात्र, आता त्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
गोल्डी ब्रारचं खरं नाव सतींदरजीत सिंग आहे. पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात १९९४ मध्ये त्याचा जन्म झाला होता. गोल्डी ब्रारचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त उपनिरीक्षक आहेत. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई यांच्या जवळचा होता. गुरलाल ब्रार याच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, आता नवे युद्ध सुरू झाले आहे.
दरम्यान, गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होती. मात्र गुरलालच्या हत्येनंतर तो गुन्हेगारीच्या क्षेत्रात बुडाला. कॅनडातूनच गोल्डीने खुनाचा कट रचायला सुरुवात केली आणि त्याच्या गुंडांनी अनेक घटना घडवून आणल्या. यातील एक घटना म्हणजे गुरलाल सिंग यांची हत्या. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोल्डी ब्रारने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी युवक काँग्रेस नेत्याची हत्या केली होती.
का केली होती सिद्धू मूसेवालाची हत्या?
२९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार याने घेतली होती. गोल्डीने हत्येचे कारणही सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, मोहालीतील मिड्डूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता. नंतर मूसवालाने त्याच्या व्यवस्थापकाला मदत केली. या शत्रुत्वामुळे लॉरेन्स टोळीने मूसेवाला यांची हत्या केली.
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फराणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी ब्रारचा हात होता. खुनापासून सुरू झालेली गुन्ह्यांची ही मालिका सुरुच होता. मात्र, आता गोल्डीचीच हत्या झाल्याचे समोर आले आहे.