मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जागावाटप अखेर जाहीर झाले आहे. जागावाटपादरम्यान, महायुतीमधल्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळाली. अनेक बैठकांनंतर महायुतीतल्या शिंदे गटाला १५ जागा वाट्याला आल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही धक्कातंत्र वापरत मुंबईत विद्यमान खासदारांना डावलत नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
मुंबईत पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी या विद्यमान खासदारांचे तिकीट कापत भाजपने दुसऱ्याच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांचे तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. तर ईशान्य मुंबईत खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यमान खासदारांना डावलून नव्या उमेदवारांना संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.
मुंबईत भाजपने तीन उमेदवार का बदलले या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सात, आठ उमेदवार बदलले आहे. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय करत असतो. अनेकवेळा लोकसभा लढणाऱ्यांना विधानसभा लढायला सांगितली जाते. विधानसभा लढणाऱ्यांना लोकसभा लढा म्हणतो. पक्षाची ही पद्धत आहे. ज्यांना आम्ही बदलले त्यांनी चुकीचे किंवा वाईट काम केले, असे आम्ही म्हणणार नाही. पण परिस्थिती प्रत्येक निवडणुकीत वेगळी असते. त्यावेळच्या परिस्थितीत कोण उमेदवार योग्य असेल, असा विचार करुन उमेदवार द्यावा लागत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यात महायुतीचे जागावाटप झालेले आहे. आम्हाला मिळालेल्या जागांपैकी पालघरची जागा आम्हाला घोषित करायची आहे. आमची जागा आज किंवा उद्या घोषित होईल असेही फडणवीस म्हणाले. अजित पवार की एकनाथ शिंदे यापैकी कोणाची मनधरणी करण्यात वेळ गेला, असे विचारले असता फडणवीसांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ठाणे आणि दक्षिण मुंबई आम्हाला हवी होती. पण त्यांची भूमिका होती की वर्षानुवर्षे या जागा त्यांच्या आहेत. आमचेही काही युक्तिवाद होते. चर्चा झाल्यानंतर जो निर्णय झालाय, त्यासाठी आम्ही बांधिल आहोत. त्यामुळे फार कोणाला मनवायला लागले नाही. पण बैठका आम्ही बऱ्यापैकी केल्या. युक्तीवाद केले, पण निर्णय मात्र एकमताने घेतला, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.