Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीस्वत:ची गाडी नाही तरीही कोट्यवधींची मालमत्ता!

स्वत:ची गाडी नाही तरीही कोट्यवधींची मालमत्ता!

वर्षा गायकवाड यांची ११ कोटी ६५ लाख रूपयांची संपत्ती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेले अधिकाधिक उमेदवारांची कोट्यवधींची मालमत्ता आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड व त्यांचे पती राजू गोडसे या पती-पत्नीकडे स्वमालकीचे वाहन नसले तरी त्यांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे. इतकी संपत्ती असूनही या दोघांना फिरण्यासाठी दुसऱ्याचे वाहन वापरावे लागत आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. त्यांचे पती राजू गोडसे यांचीही हीच अवस्था आहे. विशेष म्हणजे मागील साडेचार वर्षात गायकवाडांच्या संपत्तीत साठ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, विना परवाना सभा, मोर्चा आणि आंदोलनांपायी त्यांच्याविरोधात सात गुन्ह्यांची नोंद आहे.

वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उत्तर मध्य मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार गायकवाड पती-पत्नींकडे स्वतःचे कोणतेच वाहन नाही. मात्र, दोघांकडे मिळून ३ कोटी ९६ लाख ९० हजार ५६९ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. ७ कोटी ६८ लाख ४८ हजार ५६५ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती ११ कोटी ६५ लाख ३९ हजार २२५ रूपये इतकी आहे. साडेचार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ४ कोटी ८१ लाख ५३ हजार २६९ रुपयांची संपत्ती होती. त्यामुळे गायकवाड यांच्या संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. तर, मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी गायकवाड दांपत्यावर कोणतेच कर्ज नव्हते. आता मात्र त्यांच्यावर १ कोटी १ लाख ६० हजारांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांच्यावरील ८० लाखांचे कर्ज हे त्यांच्या पतीकडून घेतलेल्या रकमेचेच आहे. वर्षा गायकवाड यांच्या शपथपत्रानुसार आझाद मैदान पोलिस ठाणे, चुनाभट्टी आणि वांद्रे पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद आहे.

संजय दिना पाटील चार कोटींचे मालक

शिवसेना(ठाकरे) गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मंगळवारी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची एकूण संपत्ती चार कोटींहून अधिक आहे. पाटील यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची व त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता ३ कोटी ८१ लाख ११ हजार १४३ रूपयांची आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ३६ लाख ५१ हजार ५०० रूपये इतकी आहे. त्यांची एकूण संपत्ती ४ कोटी १७ लाख ६२ हजार ६४३ रूपये आहे. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले शपथपत्र हे मराठी भाषेत आहे.

शाहू महाराज काँग्रेसचे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी आपली संपत्ती ३४२ कोटी रुपये असल्याचे अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. शाहू महाराज हे काँग्रेसच्या यादीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार समजले जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -