- राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू
- पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या सूचना
- धरणसाठ्यातही मोठी घट
- एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी मोठी वणवण
- उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे बाष्पीभवन
मुंबई : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. तर संभाव्य पाणीबाणी लक्षात घेता सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यंदा राज्यभरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणत पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम हा धरण साठ्यावर झाला आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. त्यात यंदा उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने आहे तो पाणीसाठा ही वेगाने घटत असल्याने पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. मात्र, असे असले तरी राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. सध्या राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असून पुढील काळात गरज पडल्यास त्याची संख्या अजून वाढू शकणार असल्याचा अंदाज आहे. तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
राज्यात ज्या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणच्या खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप दोन महिने कालावधी असल्याने आहे ते पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याचे नियोजन सरकार करत आहेत. तर सध्या धरणसाठा असलेले पाणी केवळ पिण्याच्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचेही लाबराव पाटील म्हणाले. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, ते देशाचे काम आहे अस समजून त्याच नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले
हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.