Friday, July 11, 2025

Tutari : तुतारीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अडचणीत!

Tutari : तुतारीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अडचणीत!

बारामतीपाठोपाठ शिरुरमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह!


मुंबई : बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही एका अपक्ष उमेदवाराला तुतारी (Tutari - Trumpet) चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवे पक्षचिन्ह दिले आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनाही तुतारी (Trumpet) हे चिन्ह दिले जात असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकतेच चिन्हांचे वाटप केले आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हाचे आयोगाकडून मराठीत तुतारी असे भाषांतर करण्यात आले आहे. खरेतर हे चिन्ह दिसण्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मात्र आयोगाने ट्रम्पेटचे भाषांतर तुतारी असे केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हे चिन्ह मिळाले आहे. मी निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या चिन्हामध्ये मतदारांची दिशाभूल होणार नाही, असे वाडेकर यांनी म्हटले आहे.


दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारालाही आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ट्रम्पेट चिन्ह आणि ‘तुतारी’त साधर्म्य असल्याने बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला होता. आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी सांगितले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >