रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने नेत असताना महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. यावर बोलण्याचे कुठलेच मुद्दे विरोधकांकडे नसल्याने ते जातीभेद निर्माण करत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी नेहमीच माणुसकीचा धर्म जपत काम केले असून असे नेतृत्व पुन्हा या देशाला मिळवून देतानाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करा, असे आवाहन भाजपा महायुतीचे रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी जिल्हा परिषद गटात मेळावे घेण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी या मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वाटद आणि कोतवडे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी सकाळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी- रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, कुठलेही मुद्दे नसल्याने विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. संविधान बदलणार असा अपप्रचार सुरु आहे. पण पंतप्रधानांनी कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही, त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत. या जातीतील लोकांचे जीवनमान वाढावे यासाठी ते काम करत आहेत. कोरोना काळातील त्यांच्या कामामुळे आपण या महामारीचा सामना करू शकलो, मोफत अन्न, मोफत घर, घराघरात पाणी, औषधोपचारांसाठी आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांसाठी त्यांनी योजना आणल्या आहेत. भारत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करणार असतानाच तो विकसित, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मोदींच्या या कुठल्याच कामापर्यंत पोहोचण्याची क्षमता विरोधकांची नसल्याने आणि विरोधाचे मुद्दे नसल्याने जसे पावसाळ्यात बेडूक उगाचं ओरडतात तसे विरोधक निवडणुका आल्यावर विरोध करत आहेत, असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आणि कार्यपद्धतीवर टीका केली.
राणे म्हणाले, या राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून मी अनेक पदांवर काम केले आहे. त्यावेळी मी जात, धर्म पहिला नाही, मदत मागायला जे कोणी समोर येत त्या प्रत्येकाला मदत करणे हे माझे कर्तव्य समजतो. सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले, तिथले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी रोजगार देणारे प्रकल्प घालवून तुमचे नुकसान केले आहे. मात्र आता या भागाचा विकास करत विकसित भारतामध्ये कोकणचे नाव अग्रणी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, मला तुमची सेवा करायची आहे यासाठीच येत्या ७ मे रोजी मतदानाला बाहेर पडा, असे आवाहन त्यांनी केले.
हातखंब्यात महायुती कार्यकर्ता मेळाव्याला हजारोंची उपस्थिती
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हातखंबा येथील सिद्धगिरी मंगल कार्यालयात महायुती कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी आणलेल्या विविध योजनांची माहिती देतानाच देशाची प्रगती साधायची असेल तर मोदींसारखे खंबीर नेतृत्वच हवे असे सांगून कमळासमोरील बटण दाबून महायुतीचा उमेदवार इथला विकास साधण्यासाठी संसदेत पाठवा, असे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण, यांनीही आपल्या भाषणातून नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेना नेते किरण सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, बाबू म्हाप, कांचन नागवेकर, विनया गावडे, प्रविण पांचाळ, तात्या सावंत, महेश खानविलकर, बंटी वणजू आदी शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.