Friday, July 12, 2024
Homeनिवडणूक २०२४Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक!

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची बोचरी टीका

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून टीका करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महानालायक असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सोलापूरात उद्धव ठाकरे यांची काल सभा झाली. या सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा नकोशी झाली असल्याचेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावे की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा, मात्र ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास स्वामींनी लिहिलेल्या काही ओळींचा आधार घेत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||| असे रामदास स्वामींनी लिहिलेल्या ‘मुर्खांची लक्षणं’ या ओळींचा वापर करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -