Thursday, July 3, 2025

Corona side effects : कोरोनाचे 'साईड इफेक्ट्स' आता आले समोर!

Corona side effects : कोरोनाचे 'साईड इफेक्ट्स' आता आले समोर!

नवीन धोका वाढल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा


मुंबई : कोरोना संकटाच्या काळात डॉक्टरांकडून प्रतिजैविकांचा अतिवापर केल्याचे 'साईड इफेक्ट्स' (Corona side effects) आता समोर आले असून त्यामुळे नवीन धोका वाढल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. अनेक रुग्णांना आवश्यक नसतानाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी तीन रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. यामुळे आता प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या जगभरात जाणवू लागली आहे, अशी धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत उघडकीस आली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ४ लाख ५० हजार कोरोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची तपासणी केली. हे रुग्ण जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीतील आहेत. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या केवळ ८ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्याची गरज होती. प्रत्यक्षात डॉक्टरांकडून जगभरात सरासरी ७५ टक्के रुग्णांना सरसकट प्रतिजैविके देण्यात आली. पश्चिम प्रशांत विभागात ३३ टक्के रुग्णांना तर आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये ८३ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेत २०२० ते २०२२ या कालावधीत प्रतिजैविके देण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले. मात्र, आफ्रिकेत ते वाढताना दिसून आले.


प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर कोरोनामुळे गंभीर स्थिती झालेल्या रुग्णांमध्ये झाला. जगभरात अशा ८१ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. मध्यम अथवा सौम्य त्रास असलेल्या करोना रुग्णांना प्रतिजैविके देण्याचे प्रमाण विभागनिहाय वेगळे असून, त्यात आफ्रिकेत सर्वाधिक ७९ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रतिजैविके देण्यात आल्याने कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत त्यावेळी फरक पडला नाही. अनेक रुग्णांमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या निर्माण झाली आहे. जीवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांच्या आरोग्याला त्यामुळे अपाय झाला, असे संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.


एखाद्या रुग्णाला प्रतिजैविके देण्याची गरज असते त्यावेळी जोखमीपेक्षा फायदा अधिक असल्याचे तपासले जाते. मात्र, गरज नसताना रुग्णाला प्रतिजैविक दिल्यास कोणताही फायदा होत नाही. उलट रुग्णामध्ये प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिजैविक प्रतिरोध विभागाचे प्रमुख डॉ. सिल्व्हिया बर्टानोलियो यांनी म्हटले आहे.



प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजे काय?


एखाद्या व्यक्तीला जीवाणू आणि बुरशी संसर्ग झाल्यानंतर त्यावरील उपचार म्हणून प्रतिजैविक औषधे दिली जातात. परंतु प्रतिजैविकांचा अतिवापर झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात त्यासाठी प्रतिरोध निर्माण होतो. त्यामुळे जीवाणू आणि बुरशी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. यामुळे अशा व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे अवघड बनते. त्यातून संसर्ग झालेली व्यक्ती गंभीर आजारी पडण्यासोबत तिचा मृत्यूही होऊ शकतो.

Comments
Add Comment