Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

Raj Thackeray : तारीख आणि ठिकाण ठरलं! नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणार कोकणात

Raj Thackeray : तारीख आणि ठिकाण ठरलं! नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणार कोकणात

महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा


कणकवली : गुढीपाडव्यादिवशी शिवतीर्थावर आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आणि राज्यात महायुतीला आणखी बळ मिळाले. शिवाय देशपातळीवरही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाठिंबा दिल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. यानंतर राज ठाकरे जाहीर सभा कधी घेणार याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली असून राज ठाकरे आपली पहिली प्रचार सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी घेतली जाणार आहे.


राज ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या ४ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता कणकवली येथील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होईल. काल मनसेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेत राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांची आठवण येते, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. यानंतर आता राज ठाकरे प्रचारासाठी उतरणार आहेत.


रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. नारायण राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या हाडवैरामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपमध्ये एकमेकांवर टीका-प्रतिटीका, वार-प्रतिवार केले जात आहेत. मात्र, आता राज ठाकरे मैदानात उतरल्याने नारायण राणे यांच्या प्रचाराला आणखीनच धार चढणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कोणावर टीका करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Comments
Add Comment