संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
मी आज हे जे काही सांगणार आहे त्याच्यावर तुमच्यापैकी कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे.
तुम्हीच कशाला पण माझा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. मी पुन:पुन्हा-चार सहा ठिकाणी चौकशी करून खात्री करून घेतली आणि नंतरच विश्वास ठेवला.
तुम्ही विश्वास ठेवणार नाही तरीही सांगतो…
रवींद्रकुमार सैनी नावाचा हरयाणातील साहरनपूरचा रहिवासी…
वय वर्षं तेवीस…
हा रवींद्रकुमार साहरंगपूरला ऑडिओ व्हीडिओचं एक दुकान चालवायचा.
आपल्या भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत त्यांच्यापैकीच एक. विशेषकरून महिंद्रसिंग धोनीचा चाहता. ज्याला इंग्रजीत ‘फॅन’ म्हणतात ना तसा हा धोनीचा पंखा…
एकदा त्याला त्याची मैत्रीण सहजच म्हणाली, ‘अरे तू जर धोनीचा एवढा भक्त आहेस तर मग त्याच्यासोबत तुझा एकही फोटो नाही?’
झालं… स्वारी जिद्दीला पेटली आणि…
सध्या महिंद्रसिंग धोनी कुठे आहे याची चौकशी करता करता धोनी सध्या रांची येथे असल्याचे रवींद्रकुमारला कळलं. या रवींद्रकुमारने तडक रांची गाठली. एक दोन नव्हे तर तब्बल पस्तीस दिवस तो रांचीला हॉटेलमध्ये रूम घेऊन तळ ठोकून बसला आणि त्यानंतर धोनी रांचीहून मुंबईला विमानानं निघाला असता विमानतळावर रवींद्रकुमारने सुरक्षा रक्षकांचं कडं भेदून धोनीपर्यंत मजल मारली. त्याचाशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्याबरोबर आपलं एक छायाचित्रही काढून घेतलं. धोनीबरोबर फोटो काढून घेण्याची जिद्द पूर्ण केली. पण या जिद्दीची किंमत किती याची कल्पना आहे?
त्या रवींद्रकुमार सैनीने त्याच्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेलं ऑडिओ व्हीडिओचं दुकान चक्क विकलं. साहरनपूर ते रांची हा प्रवास आणि रांचीमध्ये तब्बल पस्तीस दिवसांचा मुक्काम यांचा खर्च करण्यासाठी त्याला आपलं दुकान विकावं लागलं…
मला ठाऊक आहे की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी स्वतः किमान दहा ठिकाणी नीट चौकशी करून नंतरच हे सांगतोय.
काय म्हणाल तुम्ही या रवींद्रकुमार सैनीला…
जिद्दी? की मूर्ख?
तो स्वतःला काय म्हणत असेल?
‘मैं जो कहता हूँ वो करके दिखाता हूँ।’ असा अभिमान वाटत असेल? की…
आपण केलेल्या गोष्टीबद्दल नंतर पश्चात्ताप झाला असेल?
त्याला काय वाटत असेल हे मला ठाऊक नाही पण मला मात्र त्याची कीव आली. बिच्चारा… आपल्याच एका खोट्या जिद्दीचा गेलेला बळी.
असे अनेक रवींदकुमार आपल्याला आढळतात. तुमच्याही ओळखीपाळखीत असा एखादा माणूस असेलच. कोणत्या तरी एखाद्या नादापायी चांगलं सुरळीत चाललेलं आयुष्य कवडीमोल किमतीला उधळून लावणारे अनेकजण आपण पाहतो.
आणखी एक सत्य घटना…
कॉलेजमध्ये शिकणारे काही विद्यार्थी दहा-बाराजणांचा ग्रुप करून मोटारसायकली घेऊन सहलीला गेले. रात्री दारू प्यायले आणि बोलता बोलता पैज लावली गेली.
रेल्वे ट्रकमधून मोटार सायकल चालवायची.
पुढे काय झालं ते मी सांगायलाच हवंय का?
समोरून आलेल्या रेल्वेने उडवल्यामुळे तीनजण जागच्या जागी मेले. दोघेजण पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यामुळे कायमचे अपंग झाले आणि चारजण सहा-आठ महिने हॉस्पिटलमध्ये राहून कसेबसे बरे होऊन परतले.
या अशा गोष्टींना तुम्ही काय म्हणाल?
जुगाराच्या दारूच्या व्यसनापायी, बायकांच्या नादापायी अनेक संसाराची वाताहत होते हे आपल्याला ठाऊकच आहे. पण जुगार आणि बाई बाटली यांच्या नादापेक्षाही भयानक असे नाद असतातच की…
सुरुवातीला अत्यंत निरूपद्रवी वाटणारे हे नाद पुढे आयुष्याचा ताबा घेतात आणि अनेकदा अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं.
महंमद अली रोडवर एक हातगाडी चालविणाऱ्या माणसाने म्हणे ‘हम आपके है कौन?’ हा चित्रपट तब्बल साडेतीनशे वेळा पाहिला. दररोज तो दुपारी तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बसायचा आणि पिक्चर बघून यायचा. जर कधी हाऊसफुल्ल असला आणि तिकीट मिळालं नाही, तर चक्क ब्लॅकमधे विकत घ्यायचा. वेळ आणि पैशांचा हा अशा प्रकारचा अपव्यय करून त्याने काय साधलं हे त्याचं त्यालाच ठाऊक…!
अशी ही नादिष्ट माणसं. एखाद्या गोष्टीसाठी जिद्दीला पेटतात आणि त्यासाठी काय वाटेल ते करतात. वाटेल ती किंमत मोजतात. कधी पैशांची. कधी आयुष्याची…
बरं यातून नेमका फायदा कुणाचा? त्यांचा स्वतःचा? आजूबाजूच्यांचा? समाजाचा? राष्ट्राचा? की कुणाचाच नाही?
दूरदृष्टीच्या अभावामुळे आपल्या कृतीचे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा विचार न करता केवळ क्षणिक सुखाकरिता ही माणसं स्वतःचंच नुकसान करतात… आपलं स्वतःचं आणि अनेकदा आपल्याबरोबर इतरांचंही…
अर्थात याच पठडीतले पण वेगळ्या वर्गात मोडणारे आणखीही वेगळ्या प्रकारचे लोक असतात. एखाद्या जिद्दीनं प्रेरित होऊन, एखाद्या ध्यासानं वेडी होऊन आपलं उभं आयुष्य पणाला लावणारा आणखीन एक वेगळा वर्ग असतो.
स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन त्यासाठी उभं आयुष्य पेटवून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.
सतीची चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून तत्कालीन समाजातील उच्चभ्रूंबरोबर वैर पत्करणारे आणि सरकारदरबारी झगडणारे राजा राममोहन रॉय.
धरण विस्थापितांच्या न्याय्य हक्कासाठी लढता लढता सुखाचं आयुष्य स्वखुशीनं वैराण करणाऱ्या मेधा पाटकर.
कुष्टरोग्यांना समाजात मानाने जगता यावं म्हणून आयुष्यभर सेवेचं व्रत घेतलेले सेवाव्रती बाबा आमटे.
विजेच्या दिव्याचा शोध लावण्याचा ध्यासापायी एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षं प्रयोगशाळेत अथक प्रयोग करणारे एडिसन.
अभिजात संगीताच्या उपासनेसाठी बालवयातचे घराचा त्याग केलेले, असंख्य हालअपेष्टांतून स्वरशिल्प उभे करणारे पंडित भीमसेन जोशी. शिवचरित्र सातासमुद्रापार नेणारे बाबासाहेब पुरंदरे.
अशी अनेक नावं सांगता येतील…
हे देखील छांदीष्टच. पण यांचे छंद मात्र वेगळे…
यांच्या छंदाला केवळ ‘मी आणि माझं क्षणिक सुख’ एवढंच कुंपण नसतं. इथं समाजाच्या मांगल्याचा विचार केलेला असतो. केवळ आपल्याच नव्हे तर समाजाच्या कल्याणाचा विचार त्यात सामाविष्ट असतो. म्हणूनच यांचे छंद हे केवळ छंद उरत नाहीत. हे छंद एक व्रत होतं. या व्रतातून त्यांना स्वतःला तर आनंद मिळतोच मिळतो पण तोच आनंद इतरांपर्यंतही पोहोचतो. त्यातून समाजाचा अभ्युदय होतो. आज आपलं जग जे सुंदर दिसतंय ते या अशा छादिष्टांमुळे…
यांच्या छंदाला व्यसन असं लेबल लावता येणार नाही.
छंद आणि व्यसन यात मोठा फरक असतो तो त्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या प्रतीचा आणि नंतर होणाऱ्या परिणामांचा…
व्यसनातून मिळणारं सुख हे केवळ त्या व्यसनी व्यक्तीपुरतं मर्यादित असतं. छंदातून स्वतःबरोबर समाजालाही आनंद देता येतो.
व्यसनाचं सुख हे केवळ क्षणभंगुर असतं. नशा उतरली, जिद्द पूर्ण झाली की ते सुख संपलं. छंदांतून मिळणारा आनंद हा दीर्घकाल टिकणारा असतो.
व्यसनामुळे केवळ स्वतःचंच नव्हे तर आजूबाजूच्यांचंही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नुकसान होतं. त्यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास होतो. व्यसनांचे दूरगामी परिणाम वाईटच असतात. छंदांचे दूरगामी परिणाम नेहमी चांगलेच असतात.
व्यसनामुळे आयुष्याची राख होते. आयुष्य जळून जातं. तर चांगल्या छंदांमुळे आयुष्य उजळून निघतं.
‘जळणं’ आणि ‘उजळणं’ यात जो फरक असतो, तोच फरक व्यसन आणि छंद यामध्ये असतो. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा छंद जडवून घेताना किंवा कोणत्याही गोष्टीच्या नादाला लागताना हा छंद आहे की हे व्यसन आहे याची शहानिशा करून घ्यायला हवी. आजच्या छंदापायी उद्याच्या आयुष्यात पश्चात्ताप तर करावा लागणार नाही ना याचा विचार करूनच जिद्दीनं छंद जोपासावा असं मला वाटतं…
आणि हो छंद जोपासणाऱ्यांना आपल्या छंदाचा कधीही पश्चात्ताप करावा लागत नाही. नादिष्ट अन् व्यसनी माणसांना मात्र भावनेच्या भरात क्षणिक जिद्द पूर्ण करण्यासाठी केलेल्या आपल्या कृतीचा पुढे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो.
कुणास ठाऊक? त्या रवींद्रकुमार सैनीला दुकान विकल्याबद्दल कदाचित आता पश्चात्तापही होतही असेल.