जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना?
मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाचे नुकसान होऊन जाते. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि कठीण काळात शेती करू शकतात. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना आणखी तीन योजना आखल्या आहेत. या तिन्ही योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. जाणून घ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती.
पंतप्रधान पीक विमा योजना
शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून मदत करते.
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड हीदेखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना १९९८ सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मिळते. प्रत्येक चार महिन्यांला ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करता येतो.