नेहमीप्रमाणे यशश्रीकडे परीताई आली. यशश्रीने चहा केला. दोघीही चहा घेऊ लागल्या. चहा पिता पिताही यशश्री परीला काही ना काही प्रश्न विचारत होतीच. दोघींचाही चहा घेऊन झाल्यावर, यशश्रीने कप स्वयंपाकघरात नेऊन ठेवलेत व परीजवळ येत प्रश्न केला की, परीताई, आकाशात तारे कसे काय निर्माण झाले?
विश्वातील हायड्रोजन वायूचे अणू हे इतर वायूंच्या अणूंसोबत व सूक्ष्म धूलिकणांबरोबर एकत्र येऊन त्यापासून प्रचंड मोठमोठे ढग बनतात व त्या ढगांपासून तारे जन्माला येतात. तसेच विश्वात काही कारणांमुळे तेजोमेघामध्ये एखाद्या ठिकाणी हायड्रोजनचे असंख्य रेणू व धुळीचे असंख्य कण एकत्र आले, तर त्यांचा प्रचंड मोठा ढग बनतो. हा ढग स्वत:च्या गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. त्यामुळे त्या ढगातील सूक्ष्म कण एकमेकांच्या जास्त जवळ येऊ लागतात. सुरुवातीला आकुंचनाचा वेग खूप कमी असतो; परंतु नंतर तो वेग खूप जोराने वाढतो. आतील सूक्ष्म कणांमधील आपसातील आकर्षण वाढू लागते.
लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे धूळ आणि वायूंच्या ढगाच्या केंद्रभागी अतिघन असा गाभा निर्माण होतो आणि त्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण खूप वाढते. या प्रक्रियेत गुरुत्वाकर्षणाच्या जोरामुळे त्याच्या गाभ्यात खूप उष्णता निर्माण होते. ही उष्णता बाहेर पडू पाहते. या उलट गुरुत्वाकर्षणामुळे हायड्रोजन व धूळ आत जाऊ पाहते. अशा रीतीने उष्णता बाहेर पडणे व हायड्रोजन-धूळ आत जाणे या परस्परविरोधी दोन शक्ती त्या मोठ्या मेघावर कार्य करू लागतात. जसजसे आकुंचन वाढू लागते, तसतसे त्याच्या केंद्र भागातील तापमानही वाढत जाते. ते तापमान जवळपास १ कोटी अंश सेल्सिअस झाल्यावर ताऱ्यांच्या अंतरंगातील औष्णिक भट्टी पेट घेते व ताऱ्यांचा जन्म होतो नि तो प्रकाशू लागतो. परीने खुलासेवार माहिती सांगितली.
औष्णिक भट्टी म्हणजे काय असते? ताऱ्यांमध्ये ती कशी तयार होते? यशश्रीने लागोपाठ दोन प्रश्न विचारले. परी सांगू लागली, अणुशक्ती निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा उभारतात, तिला ‘औष्णिक भट्टी’ म्हणतात. औष्णिक भट्टीमध्ये प्रचंड उष्णता असते. त्यापेक्षाही किती तरी पटीने जास्त उष्णता ताऱ्यात असते. ताऱ्यांमध्ये हायड्रोजनच्या अणूंमध्ये अणू संमिलनाची प्रक्रिया होऊन, चार हायड्रोजनच्या अणूंपासून एक हेलियमचा रेणू तयार होतो. ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर सतत चालू राहते. या प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. अशा रीतीने ताऱ्यात औष्णिक भट्टी तयार होते.
मग एखाद्या ताऱ्याभोवती त्याची ग्रहमालिका कशी बनते? यशश्रीने तसाच दुसरा प्रश्न विचारला. ज्यावेळी वायू व धुळीच्या एखाद्या महाकाय ढगापासून ताऱ्यांचा जन्म होत असतो, त्याचवेळी त्या महाकाय ढगाचे आकुंचनाबरोबर परिभ्रमणही सुरू होते व तेही हळूहळू वाढत जाते आणि कालांतराने त्या ढगाला मोठ्या वर्तुळासारखा व नंतर बैलगाडीच्या चाकासारखा गोल आकार प्राप्त होतो. चाकाच्या मध्यभागी गुरुत्वाकर्षण, घनता व तापमान यांचे प्रमाण सर्वात जास्त होते. परिभ्रमणामुळे बाहेरच्या भागातील धूळ व वायू आतील भागात जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे त्या चक्राच्या भागातच छोटे-मोठे पुंजके बनू लागतात. ते स्वत:भोवती फिरता-फिरता केंद्राभोवतीही फिरू लागतात. त्यांचेच ग्रह निर्माण होतात. असा ताऱ्यांभोवती त्याच्या ग्रहमालिकेचा जन्म होतो. परीने व्यवस्थित स्पष्टीकरण दिले.
तारे हे आकुंचन व प्रसरण कसे पावतात? ताऱ्यांचा आकार कायम कसा राहतो? यशश्रीने दोन प्रश्न सलग विचारले. परी सांगू लागली, तारे हे ज्वलनशील वायूचे अतितप्त गोल आहेत. त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे त्यांचे वेगवेगळे अणू हे एकमेकांस आत खेचतात आणि तारा आकुंचन पावतो. ताऱ्यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. या प्रक्रियेमुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन ती बाहेर पडते. त्यामुळे तिच्या मार्गातील अणू बाहेर ढकलले जातात आणि तारा प्रसरण पावतो. आकुंचन-प्रसरण या क्रिया घडत असताना गुरुत्वाकर्षण प्रभावी असल्यास तारा आकुंचन पावतो, तर केंद्रीय शक्ती प्रभावी असल्यास तारा प्रसरण पावतो. याचा सम्यक परिणाम ताऱ्याच्या तेजस्वीतेवर होतो व तो आकाराने स्थिर राहतो. म्हणजे आकुंचन व प्रसरण अशा दोन परस्परविरोधी दाबांमुळे ताऱ्याचा आकार कायम राहतो.
अशा रीतीने जेव्हा ही आकुंचन व प्रसरणाची दोन्ही बलं कालांतराने सारखी होतात, तेव्हा तारा स्थिर होतो. अशा स्थितीत तो काही अब्ज वर्षे जीवन जगतो. यशश्री आज आपणही इथेच थांबू या. चालेल ना? परीने विचारले. हो ताई. यशश्रीचे उत्तर ऐकून परी निघून गेली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…