Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरात्रीस खेळ चाले...

रात्रीस खेळ चाले…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

तुला निशा म्हणावे की रजनी…
तुझ्या नावातच नशा आहे रात्रीची…
सांजवेळी गुलाबी आसमंताच बोट धरून तू अलगद उतरते… मग सांज हलकेच तुझा हात सोडते तुझ्याही नकळत… अन् सर्वदूर तुझं साम्राज्य पसरतं… काळंभोर!
अंधाराची काळी शाल पांघरून, जणू तू सगळ्या जगाला कवेत घेतेस, थकले भागले जीव तुझ्या कुशीत झोपेच्या अधीन होतात!

तुझं सजणं म्हणजे रोजचा नशीला उत्सवच म्हणायचा, चंद्राच्या साक्षीने तुझ्या तारुण्याला उधाण येतं… चांदण्याची साडी नेसून तुझं नटणं थटणं…
पौर्णिमेला तुझं प्रकाशमान रूप… म्हणजे… टिपूर चांदण्यात इष्काचा उत्सव मनवणं… अप्रतिम! रातराणीच्या सुगंधात तुझं नहाणं… त्यात तुझं बहरून जाणं… मोगऱ्यालाही तुझ्या मिठीचा मोह आवरत नाही… तुझ्या आवेगाने मोहरून जातो तो, फुलत जातो अलवार… पाकळी पाकळी उमलत जाते सुगंध उधळत… पहाटेपर्यंत… गंधाळून टाकतो आसमंत… रातराणी अन् मोगऱ्याचा सुगंधी प्रणय दरवळत राहतो… चांदण्याच्या लख्ख प्रकाशात!

निशा…
तू म्हणजे प्रणयाची सम्राज्ञी…
लख लख चांदण्या म्हणजे तुझं चमचमणारं ऐश्वर्य… अशी चांदरात लेवून तुझं मिरवणं!!
क्षितिजावर… पैलतीरी सूर्यास्त होता-होता ऐलतीरावर लयीत होणारी सागराची गाज… आवेशाने तुला मिठीत घेण्यासाठी उंच लाटांचा जल्लोष! किनाऱ्यापासून दूर झाडांवर काजव्यांची आरास बघणं… आकाशातून जणू चांदणचुरा उधळला आहे… सुंदर… निशा, फक्त तुझ्यामुळेच शक्य होतं!
मुसळधार पावसात सरी अंगावर झेलत तुझं चिंब भिजणं… रातकीड्यांच्या गाण्यांची साथ… मधेच विजांचं चमकणं… त्या उजेडात लखकन तुझं रूप क्षणभराकरता नजरेस पडतं!

रजनी…
कधी प्रेमळ वाटतं तुझं हे रूप… एकदम रोमँटिक!! तर कधी उदासही करून जातं… तुझ्या काळ्याशार कायेला मोत्याच्या लडीनी सजवणं… असा हा झिम्माड पाऊस… कधी इष्काचा बहर असतो! कधी शांततेचा कहर असतो! गुलाबी थंडीतलं तुझं आगमन किती सुखावणारं… मऊशार उबदार दुलईत गुरफटून स्वप्नात रमणे तुझ्यामुळेच रजनी… पहाटेच तुझं मोहक रूप पाहून दवबिंदू सुद्धा सावरून बसतं… डोलणाऱ्या पानांवर… अन् हिऱ्यासारखं चमकतं!!
प्राजक्ताच्या फुलांचा सडा खुलून दिसतो, तुझ्या पार्श्वभूमीवर केशरी देठासह… निशिगंधाचीही मान ताठ होते तुला भेटून… चाफासुद्धा खेटून बसतो एकमेकांना… गुच्छागुच्छाने…

अशा सुवासाने गंधाळलेल्या सृष्टीमध्ये तुझा मुक्त संचार, वातावरणातील धुंदी आणखीनच वाढवतो! दिवाळीच्या अवसेला देखील पणत्यांच्या प्रकाशात तुझं लखलखणं डोळे दीपावणारं. नयनरम्य नेत्रसुख! कधी-कधी सूर्यसुद्धा वेळेत उगवणं विसरतो, हा रात्रीचा खेळ बघण्यात… पहाटेला तोही एखाद्या ढगाआड लपून, तुझं हे देखणं रूप नजरेत साठवू बघतो… मग हळुवार केशरी रंग अवकाश भरून टाकतो अन् ही नटखट सुंदरी निशा… सृष्टीला सूर्याच्या स्वाधीन करून निसटते… पुन्हा… सूर्यास्तानंतर सृष्टीला कुशीत घेण्यास अवतरण्यासाठी!!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -