एप्रिल, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शतायुषी व्हा मधुभाई…
माझं २०११ला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच वेळी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा परिचय झाला. मी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सभासद झाले आणि गेली १३ वर्षे त्या साहित्य प्रवाहात मी अशी काही रमले की, ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ मला माझं दुसरं कुटुंबच वाटू लागलं. याच भूमिकेतून मी साहित्य पालखीची भोई झाले. या दुसऱ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आम्हा सर्वांवर मुलांसारखं प्रेम करणारे ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सर्वेसर्वा. आमचे मधुभाई.
‘पद्मश्री’ या बहुमानाच्या पदवीने त्यांच्या कार्याच्या उंचीचा तर अंदाज येतोच; परंतु ही उंची गाठण्यासाठी त्यांना किती काटेरी पायवाटा तुडवाव्या लागल्या असतील, याचा अंदाज येण्यासाठी एकदा त्यांची मुलाखत घेतली.त्याआधी अनेकदा त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्या-त्या वेळेला त्यांच्याशी झालेला सुसंवाद. प्रत्येक भेटीमध्ये कळत-नकळत त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मधुभाई हे ज्येष्ठ समकालीन साहित्यिक आहेत, असं मी म्हणते. कारण मधुभाई शाळेत असताना, त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि आता नव्वदी पार केल्यानंतरही ते लिहीतच आहेत.
नुकतेच त्यांची ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. तीन पिढ्या त्यांची पुस्तकं वाचत आहेत. मधुभाई हे सुप्रसिद्ध साहित्यिक तर आहेतच, त्याबरोबर ते थोर विचारवंत, आदर्श समाजसेवक आणि माणसातलं माणूसपण जाणणारे देवमाणूस आहेत. आमच्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून, मनापासून कौतुक करणारे मधुभाई जेव्हा केव्हा भेटतात, त्या प्रत्येक भेटीत त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा पाहून मन सुखावतं आणि परमेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर जे समाधान लाभतं, ते मधुभाईंना पाहिल्यानंतर मिळतं. हा फक्त माझाच अनुभव नसून, भाईंच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचाच अनुभव आहे.
एक दिवस मधुभाईंच्या घरी त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते निवांतपणे बोलत होते, मी सहजच विचारलं, “भाई, तुमचं बालपण कुठं आणि कसं गेलं?” बालपणीच्या अनेक आठवणी सांगताना, त्यांचा चेहरा कधी उजळत होता, तर कधी उदास होत होता. शब्दांच्या बरोबर मी मधुभाईंच्या कोवळ्या बालपणाच्या पायवाटेने घटना, प्रसंग अनुभवत मागे मागे जाऊ लागले. भाई म्हणाले, “घरचं आठराविश्व दारिद्र्य. लहानपणीच मी चार वर्षांचा असताना वडील गेले. मोठ्या चार बहिणी. आईच्या मायेच्या छत्रछायेखाली माझं बालपण निराधार पोरकं आणि उनाड होतं. उनाडक्या करायचो. गणपती बनवायला, शिकारीला जायला आवडायचं. पण शाळा, अभ्यास आवडतं नसे. आई रामायण-महाभारतातील गोष्टी सांगायची आणि मी त्या कान देऊन ऐकायचो. रोज नवीन गोष्ट ऐकायला आवडत असे म्हणून आई स्वतःच गोष्ट तयार करून सांगत असे. याचा परिणाम त्या बालमनावर खोलवर झाला. कदाचित माझ्या कथेची बीजं तिथेच रुजली असावीत, असं मला वाटतं.”
एकदा त्यांच्या शाळेमध्ये साने गुरुजी आले. त्यांच्या ‘श्यामच्या आई’ने मधुभाईंच्या मनावर गारूड केले आणि साने गुरुजींना पाहिल्याची आठवण मधुभाईंनी आजही त्यांच्या हळव्या हृदयामध्ये तशीच जपून ठेवली आहे, हेही एकदा गप्पांच्या ओघात उमगले. भाईंचे आजोबा हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कार ते व स्वामी विवेकानंदाचे अनुयायी होते. त्यांनी’ हिंदू धर्म’ या पुस्तकाचं लेखन केलं होतं. त्यांचे वडील मंगेशदादा हे चांगले रसिक वाचक होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांची वाचून झालेली पुस्तकं माळ्यावर तशीच धूळ खात पडली होती. आईच्या सांगण्यावरून ती मधुभाईंनी काढली आणि वाचायला सुरुवात केली. त्यातूनच वाचनाचा छंद जडला. निसर्गरम्य कोकणाचा मनसोक्त आनंद मधुभाईंनी घेतला. त्याबरोबरच तेथील निसर्गाचे अनेक चमत्कार त्यांनी जवळून पाहिले. निसर्गसौंदर्याची अनेक रूपे अनुभवली. तेथील सामाजिक प्रश्न, समस्या माणसाचं वास्तव जीवन याकडेही उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या समस्या पुढे दूर करण्याचाही त्यांनी अतोनात प्रयत्न केला. कथा, कादंबऱ्यांमधून कोकणातील निसर्ग, तेथील माणसं, त्यांचं जीवन मधुभाई साकारू लागले. करूळला शाळा काढली. अनेक पिढ्या त्या शाळेने घडविल्या.
‘माहीमची खाडी’ ही कादंबरी वाचली नाही, असा मराठी वाचकच सापडणार नाही. माहीमची खाडी आणि मधुभाईंचं ‘करुळचा मुलगा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि एखाद्या विस्तीर्ण, स्फटिकमय गूढ, रम्य सरोवरासारखा त्यांच्या जीवनाचा पट उलगडत गेला. त्यासोबतच कोकणातील खळखळ वाहणारे झरे, तांबडी माती, मोहरलेल्या आंब्या- फणसाच्या झाडांची डवरलेली ती काटेरी वाट संपूच नये असं वाटत होतं. त्यांच्या अलवार शब्दांनी मनावर गारुड केलं.
कथा, कादंबरी, ललित लेख, व्यक्तिचित्रे, चरित्र, आत्मचरित्र, संकीर्ण, कविता, नाटक, बाल वाङ्मय, चित्रपट, दूरदर्शन मालिका इत्यादी विविध साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांच्या त्या अफाट साहित्याचा परिचय झाला, तेव्हा आश्चर्य वाटले. त्यानंतर जेव्हा भाईंना भेटले, तेव्हा मी त्यांना विचारलं, “भाई, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती केली, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तुमच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. त्याबरोबर आपण नोकरीही करत होतात. हे सर्व एकाच वेळेला कसं पेलवलं?”
मधुभाई म्हणाले, “उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं की, कथाबीज सापडते, त्यावर विचार प्रक्रिया सुरू होते. कथा कागदावर उतरली की, खूप आनंद होतो. लिखाण माझ्यासाठी ऊर्जा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी एका वेळेला मी करू शकलो.”
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते फेडण्यासाठी मधुभाईंनी अनेक संस्थांवर पदभार स्वीकारून, संस्थांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यापैकी काही संस्थांचा उल्लेख करता येईल. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात तीन-साडेतीन वर्षे माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे सरकारच्या जनसंपर्क अधिकारी या पदावरही आपण काम केले. आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होतात व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे
महाव्यवस्थापकही होतात. अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, दुसरीकडे लिखाणही चालू होते.
१९८३ साली मधुभाईंनी नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. परत २००६ साली ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष झाले. इतकेच नाही तर यांनी एक काच कारखानाही काढला होता. त्या मागचा उद्देश होता, कोकणातील गरीब लोकांना हाताला काम मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. मधुभाईंचे हे सर्व व्याप पाहून, ते लिखाण कधी करत असतील? हा मला प्रश्न पडला. या प्रश्नाचे उत्तर देताना भाई म्हणाले की, “कोणत्याही लेखकाचं अनुभव विश्व त्याला लिहिण्यासाठी प्रेरित करतं. कोणत्याही गोष्टीसाठी वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही.” भाईंची ही वाक्ये कायमच मनात रुजली.
अनेक वेळा ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमासाठी केशवसुत स्मारकांमध्ये जाणे झाले. ते ठिकाण आमच्यासाठी आता माहेरघरच झाले आहे. केशवसुत स्मारकाची उभारणी करून, मधुभाईंनी कवींसाठी ते एक काव्यतीर्थ उभं केलं आहे. केशवसुत स्मारकाच्या निर्मितीमागे मधुभाईंचा मोलाचा सहभाग आहे, त्याबरोबरच खूप कष्टातून त्यांनी ते उभे केले आहे.
मधुभाईंच्या आयुष्यात अनेक वादळं आली आणि त्या वादळांना खंबीरपणे ते हसत-हसत सामोरे गेले. त्यांना मी कधी थकलेलं पाहिलं नाही. निर्मळ स्वच्छ मनाचे मधुभाई हे सर्वांचेच प्रेरणास्रोत आहेत.
मला त्यांचा फक्त सहवासच लाभला नाही, तर त्यांचा परिसस्पर्श माझ्या शब्दांना झाला. या साहित्य प्रवाहात मधुभाईंमुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
मधुभाईंचा सहवास म्हणजे, निळ्याशुभ्र आकाशात इंद्रधनुष्याबरोबर रंग खेळण्यासारखं आहे.
ही शब्द सुमनांची ओंजळ मधुभाईंच्या ९३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या कवितेतून त्यांना अर्पण करते…
भाई,
वादळ कवेत घेऊन
चालत राहतात तुम्ही जेव्हा
शब्दांचं मोहळ…
तुमच्या डोळ्यांत दाटून येतं तेव्हा
वाचत राहते तुम्हाला
एखाद्या पुस्तकासारखी
पानन् पान आयुष्याचं
तुम्ही लिहून ठेवलेलं खरेपणाने
म्हणूनच त्या शाईलाही
सुगंध येतो वेदनेचा
शांत धीर गंभीर
स्थितप्रज्ञ पाहाडासारखे
तुम्ही हवं तसं जगलात
ना भीती ना चिंता
जाणवली कधी तुमच्या डोळ्यांत
कायमच एक स्मित रेषा
पाहात आलेय ओठांवर
तीच बळ देते
तुमच्या सहवासात असलेल्या
सर्वांनाच
तुम्ही आजातशत्रू झालात भाई
कारण तुम्हाला माहीतच नाही
आपलं परकं मानणं
भरभरून दिली मायेची सावली
अन्…
झालात वटवृक्ष
तुमच्या गर्द छायेत पंख पसरून
आम्ही निश्चिंत झालो
मधुभाईंना चांगले आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. भाईंच्या कार्याला शतशः प्रणाम करून वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…!
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…