लवकरच होणार घोषणा
ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप फायनल झाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. मात्र ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आले असल्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची लवकरच घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यममत्री शिंदे यांच्या गटाकडे आला असून मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व विश्वासू सामजले जाणारे आमदार प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची नावे सध्या चर्चेत असून प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे समोर आले आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याचे समजते. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवारी राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.