
'असं' असेल नवे वेळापत्रक
मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) मोठी घोषणा केली आहे. मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत उन्हाळी सत्रातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे ६, ७ आणि १३ मे रोजी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारीत तारखा विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. परिपत्रकानुसार, ६ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता १८ मे रोजी होणार असून ७ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा २५ मे रोजी घेण्यात येणार आहेत. तसेच १३ मे रोजी असणाऱ्या परीक्षा थेट ८ जूनला घेण्यात येणार आहेत. परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला असला तरी परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी मतदारसंघांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान १३ मे रोजी पार पडत आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधल्या एकूण ६ मतदारसंघांमध्ये मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. या मतदानाच्या दिवशी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाही. त्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.