Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलशब्दांची लाडीगोडी : कविता आणि काव्यकोडी

शब्दांची लाडीगोडी : कविता आणि काव्यकोडी

दादा आमचा बोलताना
शब्दाला जोडतो शब्द
त्या जोडशब्दातून मग
भेटतो नवीन शब्द

बडबडणाऱ्याला म्हणतो
बोलू नका अघळपघळ
काटकसरीने वागा जगा
करू नका उधळमाधळ

अभ्यास करूनी परीक्षेत
दाखवावी अक्कलहुशारी
मस्करीची होते कुसकरी
कशास हवी थट्टामस्करी

मित्र असावा साथीला
लाभावी संगतसोबत
गप्पांची भरावी शाळा
उलगडावी गंमत जंमत

लहानथोर साऱ्यांचीच
विचारावी ख्याली-खुशाली
सबब सांगून कुठलीही
करू नये ढकला ढकली

दादा म्हणतो शब्दांचा
असा साधावा ताळमेळ
फुलत जाते भाषा तेव्हा
पाहू नये काळवेळ…!

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) खरमरीत बोलण्यासाठी
कोणाला सतत टोचतात?
नाकबूल होण्यासाठी
कशावर हात ठेवतात?

पटकन विश्वास ठेवणारा
कशाने असतो हलका?
नाव त्याचं सांगा
लवकर तुम्ही बरं का?

२) हा असेल ओला
तर मित्र लागे भला
याच्या काकणाला म्हणे
आरसा कशाला

हा जिथे फिरे
तिथे लक्ष्मीही फिरे
कुणाबद्दल बोलतात त्याचे
नाव सांगा खरे?

३) सत्य कळले
की हे उघडतात
बेशुद्ध पडले की
हे पांढरे होतात

आश्चर्यचकित होताच
हे विस्फारतात
खोटेनाटे सांगून
धूळ कोठे फेकतात?

उत्तर –

१) कान
२) हात
३) डोळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -