Thursday, July 18, 2024

मदत

कथा – रमेश तांबे

सर्व मुलांच्या परीक्षा संपून निकालदेखील लागले होते. आता मे महिन्याची सुट्टी लागली होती. पंडित नेहरू विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची एक टीम खूपच हरहुन्नरी होती. त्या टीममध्ये विकी, विजय, तनिश, प्रिया आणि वृंदा अशी मुले होती. ही टीम शाळेत प्रसिद्ध होती. वेगवेगळ्या गड-किल्ल्यांना भेटी देणे, जंगल, माळरानात भटकंती करणे, शाळेच्या सहलीच्या आयोजनात भाग घेणे, परिसरातल्या छोट्या-मोठ्या डोंगरावर जाऊन गिर्यारोहणाचा आनंद लुटणे, या गोष्टी ते सतत करत असत.

आता ही टीम उत्तम गुण मिळवून, इयत्ता आठवीत पोहोचली होती. त्यामुळे त्यांचे मे महिन्यात काय-काय करायचे, याचा बेत आखणे चालू होते. विचाराअंती कर्नाळ्याच्या पक्षी अभयारण्यास जायचे, तिथल्या पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता-घेता, कर्नाळा किल्ल्यावर चढाई करायचे असे ठरले. मुंबईहून पहाटे ५.३० वाजता महाडला जाणारी गाडी त्यांनी पकडली. या टीमची प्रमुख प्रिया होती. कारण प्रियाला अशा धाडसी सहलींचा चांगलाच अनुभव होता. कारण तिचे बाबा नियमितपणे गिर्यारोहणाला जातात. त्यांच्यासोबत बऱ्याचदा प्रियादेखील असते.

एक-दीड तासांतच प्रिया आणि तिची टीम कर्नाळा अभयारण्याच्या ठिकाणी उतरली. तेव्हा सकाळचे ७ वाजले होते. गाडीतून खाली उतरताच, एक सुखद गारवा त्यांना जाणवला. सर्वत्र हिरव्यागार झाडांची गर्दी, तिथे असलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांचा एक प्रकारचा गंध सर्व वातावरणात भरून राहिला होता. त्या हिरव्यागार जंगलात नागमोडी वळणाची लांबलचक सडक काळ्याकुट्ट नागासारखी पडली होती. सारे वातावरण मन प्रसन्न करणारे होते.

आता प्रियाने तिच्या सर्व मित्रांना जवळ बोलावले. प्रत्येकाने आपापल्या बॅगा पाठीवर अडकवल्या. डोक्यावर टोपी, गळ्यात पाण्याची बाटली आणि हातात काठी, सोबत मोबाइल कॅमेरा होताच. वेगवेगळ्या पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी! प्रियाने सर्वांना आपले नेहमीचे नियम समजावून सांगितले आणि ते पुढे निघाले. तसे कर्नाळ्याचे पक्षी अभयारण्य प्रसिद्ध होते. तिथे अनेक पक्षी सहजपणे दृष्टीस पडत होते. त्यात मलबार, कोकीळ, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, टिटवी असे किती तरी पक्षी दिसत होते. वृंदा आणि तनिशकडे व्यावसायिक कॅमेरे होते. त्यातून त्यांना दर्जेदार फोटोग्राफी करता येत होती. बघता-बघता ११ कधी वाजले तेच कळले नाही.

आता सारे जण कर्नाळा किल्ल्याच्या चढणीला लागले होते. तो प्रचंड उंच सुळका साऱ्यांना खुणावत होता. त्यावेळी अनेक हौशी मुले-मुली गिर्यारोहणाचा आनंद घेत होती. दहा-पंधरा मिनिटे झाली असतील, तोच त्यांच्या बाजूने किल्ला चढणारा एक चाळिशीतला तरुण चक्कर येऊन खाली कोसळला. तो नेमका डोक्यावर पडल्याने, डोक्यातून रक्त वाहू लागले होते. त्या तरुणाची पत्नीही त्याच्यासोबतच होती. असे घडताच त्याची पत्नी ओरडली. मदतीसाठी धावा करू लागली.

ओरडण्याचा आवाज कानी येताच विजय, तनिश तिकडे धावले. दगडाच्या फटीत अडकलेल्या तरुणाला त्या दोघांनी ताकद लावून बाहेर काढले. त्याचे डोके विजयने आपल्या मांडीवर ठेवले. डोक्याला मोठी जखम झाली होती. त्यातून घळघळा रक्त वाहत होते. प्रियाने लगेच त्यांच्याकडे असलेली औषधांची पेटी बाहेर काढली. तोपर्यंत विजय हाताने रक्त थांबवण्याचा प्रयत्न करीत होता.

प्रियाने हलकेच जखम धुऊन काढली. कापसाला औषध लावून बँडेज पट्टीने डोके बांधून ठेवले. पण तो तरुण अजूनही बेशुद्धच होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते. विकी धावतच मुख्य रस्त्यावर पोहोचून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. विजयने साऱ्यांच्या मदतीने जवळजवळ एक किलोमीटरचा खाचखळग्यांचा प्रवास करून, त्या तरुणाला मुख्य रस्त्यावर आणले. तोपर्यंत विकीने रुग्णवाहिका थांबवली होती. त्यांनी झटपट त्या तरुणाला पनवेलच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. एवढा वेळ त्याची पत्नी भीतीने घाबरून फक्त रडत होती. काहीबाही बरळत होती. थोड्या वेळाने प्रियाने डॉक्टरांना विचारून प्रकृतीला धोका नसल्याचे त्या तरुणाच्या पत्नीला सांगितले. तोपर्यंत त्यांचे नातेवाईकदेखील आले होते. त्यांनी प्रिया आणि तिच्या टीमचे आभार मानले. “शाळकरी मुलांनी मोठे प्रसंगावधान दाखवून तरुणाचे प्राण वाचवले” अशी बातमी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. तेव्हा मात्र आपल्या हातून काही तरी चांगले काम घडले, याचे समाधान साऱ्या मुलांना वाटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -