Saturday, July 20, 2024

निर्णय क्षमता

माेरपीस: पूजा काळे

व्यक्तिसापेक्ष आचार, विचार, सुखदुःख यांच्या आलेखाचे चढउतार ठरलेले असतात. सर्वस्व घेऊन आलेली आणि सर्वस्वाला वाहिलेली माणसं हाताच्या बोटांएवढीचं म्हणता येतील. वळणा-वळणाशी हुलकावण्या देणाऱ्या, ओंजळभर सुखापेक्षा दु:खाचे दाह भयंकर असतात. आलेले अनुभव चांगल्या-वाईट गोष्टीस नेहमीच कारणीभूत ठरतात. त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेता यावर सर्वस्व अवलंबून असते.

खरं तर निर्णय घेण्याची वा देण्याची क्षमता, नसणं हा मुखत्वे आत्मविश्वासाचा नसण्याचा भाग झाला. एखादी गोष्ट तुम्हाला करायचीयं, पण करता येत नाहीय, किंबहुना म्हणावा तेवढा आत्मविश्वास, तेवढं बळ अंगी आणता येत नाहीय. या प्रकारच्या स्थितीतली अवस्था म्हणजे; चिंतन, मनन, अवलोकन
यांचा अभाव.

या परिस्थितीतल्या व्यक्तींचं जीवन गुंतागुंतीचं होतं. हो – नाहीच्या संभ्रमित अवस्थेत कोणतीचं गोष्ट साध्य होत नाही. यास्तव वैयक्तिक स्तर खालावतो. याचा सापेक्ष परिणाम अर्थात कार्यक्षमतेवर जाणवू लागतो. अस्वस्थता, अंदाजे निर्णय घेणे यामुळे पश्चातापाची पाळी येते. अशा लोकांमध्ये स्थिरतेचा कायम अभाव दिसून येतो. आजचं हसतं खेळतं चित्र उद्या दिसेलचं असं नाही. अशा लहरी स्वभावाची अनेक उदा. देता येतील. वेळा न पाळणं, न पटणारी कारणं देणं, अविचाराने आत्मघातास प्रवृत्त करणं. ठोस निर्णयाप्रती न येणं; ही सगळी कमकुवत विचारांची लक्षणं होत.

एखादी गोष्ट वारंवार तपासून पाहणं. चंचलतेमुळे एकाग्रतेची क्षमता नष्ट होणं. यातल्या बऱ्याचं जणांना आपल्याला नेमक काय होतंय, हे देखील सांगता येत नाही. मग मनातले दोष वृत्तीवर घाव घालण्यास कारणीभूत ठरतात. पुढे जाऊन वृत्ती विकारास परावृत्त करते. कधी गरम तर कधी थंडी वाजणं, भूक न लागणं, तर कधी अतिरिक्त आहार घेणं वाढीस लागतं. सतत कपडे बदलण्याची सवय जडणं, तर कधी पाय हलवण्याची वाईट सवय लागणं. ही सगळी ढासळलेल्या मानसिकतेची लक्षणं दाखवतात.

लहानपणापासून निर्णयक्षमता कमी असलेल्या एका तरुणाचं मन नोकरी व्यवसायत रमत नव्हतं. दुसऱ्या नोकरीची संधी येताचं पहिल्या नोकरीवर पाणी सोडण्याच्या स्वभावामुळे, थाटलेल्या व्यवसायाला गती येईना. परिणामी मिळकत आणि कुटुंबावर आलेली दु:खाची कळा त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली ती अगदी शेवटपर्यंत. म्हणून तर आपल्याकडे सुसंगती सदा, घडो सृजनवा, हा विचार पूर्वीपासून आलाय. बहुमताचा विचार करणे, ही निर्णय घेण्यामागची प्रमुख प्रक्रिया यशाची गुरुकिल्ली ठरते. योग्य वेळी योग्य निर्णय त्याने जीवन सुखमय हा धागा सांधला तर, येणारा प्रत्येक मार्ग यशाकडे घेऊन जाणारा दीपस्तंभ ठरेल.

आज एकविसाव्या शतकाने सगळी दालनं खुली केली असताना; तुमचा एक चांगला निर्णय जीवन घडवेल तर एक चुकीचा निर्णय तुम्हाला तळ गाठायला लावेल. एवढी ताकद या निर्णय क्षमतेत सामावली आहे. अनमोल जीवन सुंदर, समृद्ध करा. जीवन रहस्याचा सळसळता आनंद ताज्या मनानं घ्यायला शिका. दैवी देणगी म्हणून तिचा स्वीकार करा. अचूक निर्णयाप्रती भावी पिढीने केलेला सकारात्मक दृष्टीचा विचार; पुढे जाऊन वर्तमानातील दरवाजे भविष्यकाळाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वागत करण्यास उत्सुक असतील. आपल्या हुशारीने, कला-कौशल्यासह निर्णय क्षमतेला कोंदणात बसवा आणि आपला परीपूर्ण विकास साधा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -