विशेष – भालचंद्र ठोंबरे
महाभारतात कौरव-पांडवांदरम्यान झालेल्या महायुद्धात विविध प्रकारच्या भयंकर विध्वंसक अस्त्र-शस्त्रांचा वापर दोन्ही बाजूंकडून करण्यात आला. अठरा दिवस चालू असलेल्या, या युद्धात १८ औक्षणीय सैन्याचा मृत्यू झाला. मात्र कौरव, पांडवांच्या सर्व सैन्याचा नाश करून, हे युद्ध काही क्षणात संपविण्याची क्षमता त्यावेळी एका योद्ध्याकडे होती. त्या योध्याचे नाव होते बार्बरिक.
बार्बरिक हा भीमाचा नातू व घटोत्कच व राजकन्या मौर्वी यांचा मुलगा. त्याने माता दुर्गाची भक्ती करून तिला प्रसन्न केले होते. माता दुर्गाने त्याला तीन बाण दिले होते. म्हणून त्याला ‘तीन बाणधारी’ असेही म्हणतात. हे बाण लक्षाचा वेध घेऊन, ते बार्बरिककडे परत येत असत. तसेच अग्नीने त्याला धनुष्य दिले होते. कौरव, पांडवांमध्ये होणार असलेल्या युद्धाची माहिती कळताच, बार्बरिकही युद्धात सहभागी होण्यासाठी आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघाला. हरणाऱ्या पक्षाकडून लढण्याची त्याची प्रतिज्ञा होती. युद्धासाठी निघताना आईने त्याला त्याच्या वचनाची परत आठवण करून दिली.
भगवान श्रीकृष्णाला हे कळताच, ते ब्राह्मण रूपात बार्बरिकला वाटेत भेटले. केवळ तीन बाणांच्या साहाय्याने युद्धात भाग घेण्याची इच्छा ठेवणाऱ्या बार्बरिकवर अविश्वास दाखवित त्यांनी त्याचा उपहास केला. तेव्हा युद्ध संपविण्यास केवळ एकच बाण पुरेसा असल्याचे बार्बरिकने आत्मविश्वासपूर्णरीत्या सांगितले. तेव्हा परीक्षा म्हणून श्रीकृष्णाने शेजारीच असलेल्या झाडाच्या सर्व पानांना एकाच बाणाने छेदन करण्यास बार्बरिकला सांगितले. बार्बरिकने भात्यातून एक तीर काढून, धनुष्याला लावून वेध घेवून सोडला. बाण सर्व पानांना छिद्र करून श्रीकृष्णाच्या पायाशी फिरू लागला. ते पाहून बार्बरिक श्रीकृष्णाला म्हणाला की, “ब्राह्मणदेवता आपला पाय दूर करा. मी केवळ पानालाच छेदन करण्याची आज्ञा केली आहे.”
श्रीकृष्णाने पाय दूर करताच, बाण त्याच्या पायाखाली असलेल्या पानाला छेदून बार्बरिककडे परत गेला. बार्बरिकचे हे कौशल्य पाहून, त्यांनी ‘तू कोणाच्या बाजूने युद्धात भाग घेणार आहेस’ असे विचारले. ज्याची बाजू कमजोर असेल किंवा ज्याची हारण्याची शक्यता निर्माण होईल, त्याच्याकडून लढण्याची आपली प्रतिज्ञा असल्याचे बार्बरिकने सांगितले.
बार्बरिकचे कौशल्य व त्याची प्रतिज्ञा ऐकून श्रीकृष्ण विचारात पडले. कारण कौरवांची बाजू अधर्माची असून, ते हारणार हे निश्चित होते. अशा वेळेस बार्बरिकची उपस्थिती अडथळ्याची ठरू शकते, हे लक्षात घेऊन, त्यांनी बार्बरिककडे दान देण्याची विनंती केली. माझ्या क्षमतेत असेल तर जरूर देईन, असे वचन देत, बार्बरिकने ती मान्य केली. कृष्णाने त्याला त्याचे मस्तक देण्याची विनंती केली.
ब्राह्मण अशा रीतीचे दान मागत नाही, हे ज्ञात असल्याने आश्चर्यचकित झालेल्या, पण वचनबद्ध असलेल्या बार्बरिकने ती मान्य करीत, ब्राह्मणाला आपले मूळ रूप दाखविण्याची विनंती केली. कृष्ण आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. बार्बरिकने श्रीकृष्णाला नमन करीत, विराट रूप दाखविण्याची विनंती केली, तसेच महायुद्ध शेवटपर्यंत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने त्याला विराट रूप दाखविले, बार्बरिकने शिश दान केले, कृष्णाने त्यावर अमृत सिंचन करून, ते युद्धभूमीजवळ असणाऱ्या टेकडीवर त्याचे कटलेले शीर स्थापित केले. अशा प्रकारे महायुद्ध एक क्षणात संपविण्याची क्षमता असलेला हा अप्रसिद्ध पराक्रमी योद्धा महायुद्धाचा केवळ एक प्रेक्षक झाला. भगवान श्रीकृष्ण बार्बरिकच्या बलिदानाने खूप प्रसन्न झाले, त्यांनी बार्बरिकला कलियुगात शाम नावाने ख्यातनाम होण्याचा वर दिला. बार्बरिकचे शीर राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू नगर या गावी पुरण्यात आले. याच ठिकाणी त्याचे मंदिरही खाटू शाम नावाने प्रसिद्ध आहे.