Thursday, July 18, 2024
Homeनिवडणूक २०२४मोदींनी घेतलेले निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे; पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल

मोदींनी घेतलेले निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे; पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर ३७० कलम पुन्हा आणणार असा काँग्रेसचा अजेंडा आहे, पण कुणाच्यात हिंमत आहे का मोदीने घेतलेले निर्णय मागे घेण्याची? सीएए कायदा मागे घेण्याची हिंमत आहे का कुणाची? इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम असे पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील, अशा परिस्थितीत हा देश कधी सहन करणार नाही, असा इशारा देत मोदी यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदावरूनही भाष्य केले.

महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेत पंतप्रधान बोलत होते.

कोल्हापूरला महाराष्ट्रातील फुटबॉल हब मानले जाते. फुटबॉल हा खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. महायुती आणि इंडिया आघाडीमधील हा सामना २-० असा जिंकणार असून इंडिया आघाडीने दोन सेल्फ गोल केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील जबाबदारी कोल्हापूरकरांवर असून असा गोल करा की येणारे चार राउंडमध्ये इंडिया आघाडी चितपट होईल. त्यांनी सांगितले की, ‘सरकार बनावो आणि नोट कमाओ’ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे. भाजप तरुणांना अधिक संधी देणार आहे. बिना व्याज २० लाख कर्ज दिले जाणार आहे. महिलांची सुरक्षा ही मोदींची गॅरेटीं आहे. तीन कोटी महिलांना लखपती महिला बनवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझं एक काम करा, भेटेल त्याला सांगा मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला असेही मोदी म्हणाले. तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक आणि तामिळनाडू वेगळा देश करण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहन होईल का? त्यांना उत्तर दिलं पाहिजे. ५०० वर्षांचे स्वप्न राम मंदिराच्या निमित्ताने पूर्ण झालं असून जे रामाचे निमंत्रण स्वीकारत नाही त्यांचे काय होणार? ज्यांनी सनातन धर्म डेंग्यू मलेरिया आहे, असे म्हटले त्यांना महाराष्ट्रात आणून सत्कार केला, यावरून बाळासाहेब ठाकरे यांची काय अवस्था झाली असेल हे लक्षात येत असल्याचे म्हणाले. नकली शिवसेना औरंगजेबाला मानणारी झाली असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं असून त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याचे मोदी म्हणाले. हाच फॉर्म्युला त्यांना देशभर वापरायचा असून धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणाले.

कोल्हापूरकरांनी ठरवलेय, मान गादीला, मत मोदींना : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरची लढाई संजय मंडलिक विरुध्द शाहू महाराज आणि धैर्यशील माने विरुध्द महाविकास आघाडी अशी नाही तर नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशीच होत आहे. त्यामुळे, मान देऊया गादीला मत देऊया नरेंद्र मोदींना हे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे. कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनाच्या काळात मोफत लस देऊन तमाम भारतवासीयांना जीवंत ठेवले, त्याच नरेद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरकरांनी ठरवले आहे. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशातील २५ कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढण्याचे रेकॉर्ड केले असून वीस कोटी लोकांना हक्काचे घर दिले. गरीबांच्या कल्याणाचा चालवलेला अजेंड्याला ताकद देण्यासाठी कोल्हापूरातून संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना विजयी करा.

कोल्हापूरकर हे प्रभू रामांना मानणारे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेले धनुष्यबाण हे प्रभू रामांचे आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत त्यामुळे संजय मंडलीक व धैर्यशील माने यांना साथ द्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको : एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेससोबत जावे लागेल, त्यावेळी माझे दुकान बंद करेन. पण त्याच ठाकरेंचा मुलगा आज काँग्रेसला मतदान करणार आहे. जनाची नाही तरी, मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती. उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत. आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून तातडीने देशाच्या सेवेत आले, असे पंतप्रधान हवेत. आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको. इंडिया आघाडीसाठी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचार ही धर्म आहे. एक मोदी सबको भारी है. आपण भाग्यवान आहोत की, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भेटले आहेत. अब की बार ४०० पारमध्ये कोल्हापूरचे दोन खासदार पाहिजेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.

महायुतीच्या सभेसाठी लाखो नागरिक उपस्थित राहिले त्यांचे स्वागत आहे. धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला. इथला मतदार धनुष्यबाण समोरील खटक्यावर बोट दाबेल. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत. देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरेंटी. मोदींच्या गॅरेंटीच्या आडवा जो येईल त्यांचा काटा किर्रर्रर्र होईल, अशा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -