मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच जागेवर महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या पाच-सहा लाख असून त्यांचे मतदान शक्यतो भाजपाविरोधात जाते. विलेपार्ले, चांदिवली, कुर्ल्यातील काही भाग, कालिना, वांद्रे सरकारी कॉलनी आदी भागात मराठी, उत्तर भारतीय व अन्य मतदार आपल्याबरोबर राहतील, असे भाजपाला वाटत आहे. खासदार पूनम महाजन या २०१९ मध्ये एक लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. पण महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी पुरेसा संपर्क नसणे, आदी बाबींमुळे भाजपाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही.
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजपा नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारणातच रहायचे असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे अन्य नावांबरोबरच भाजपाने निकम यांच्याबाबतही विचार केला व त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले.
दरम्यान, १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली. निकम यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असून त्याचा त्यांना उपयोग होईल.