Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मुंबईत काँग्रेसला (Congress) प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. मुंबईत काँग्रेसचा चेहरा मानल्या जाणार्‍या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम यांचा समावेश होता. तर अनेक वर्षे काँग्रेससोबत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला आसतानाच आता आणखी एक समस्या उभी ठाकली आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसचा एक नेता प्रचंड नाराज झाला आहे. या नाराजीतून त्याने स्टार प्रचारकपदाचा थेट राजीनामा दिला आहे.

मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan) हे हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी हा राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.

नसीम खान यांनी काँग्रेस हायकमांडला स्पष्ट सांगितलं, म्हणाले…

नसीम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती. तीदेखील मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. मी पक्षाचा आदेश मानून लगेच तयारी सुरु केली होती. मात्र, आता या जागेवरुन वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको

काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज नाराज आहे, मी देखील नाराज आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. शेवटी मी पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे, असे नसीम खान यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -