मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक
शिर्डी : सदाशिव लोखंडे हा साधा माणूस आहे. झाले गेले गंगेला मिळाले. समजून त्याला पदरात घ्यावे, अशी भावनिक साद घालत लोकसभा निवडणुक झाल्यावर मला विसरले तरी चालेल. पण विखे पाटलांनी केलेली मदत विसरू नका असा सुचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना दिला.
दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी महायुतीचे पदाधिकारी बैठकीनंतर उद्योजक, वकील, हॉटेल व्यावसायीक, डॉक्टर, आघाडी, आरपीआय यांचेशी शिर्डीत संवाद साधत सदाशिव लोखंडेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, मंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, बाळसाहेब मुरकुटे, अनुराधा आदीक, राजेश परजणे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कॉंग्रेस सरकारच्या ५० वर्षाच्या सत्तेशी तुलना केल्यास पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात हिमालयाएवढे काम करून देशाचा चौफेर विकास केला. जगात भारताचे नाव आदराने घेतले जावू लागले. मोदींच्या सत्तेच्या काळात आतंकवादी हल्ले झाले नाहीत. जातीय दंगे झाले नाहीत. दहा वर्षात कधी सुट्टी न घेता २४ तास देशासाठी वाहुन घेतलेले नेतृत्व मोदींच्या रूपाने मिळाले आहे तर दुसरीकडे थोडीसी गर्मी सुरू होताच परदेशात मामाच्या गावी जातात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात भाजपा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाच्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असताना आपणच सरकारमधुन बाहेर पडून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. आपण रस्त्यावर उतरून, बांधावर जाऊन काम करतो म्हणुन जनता आमच्याबरोबर आहे. घरात बसुन काम करणारा मी मुख्यमंत्री नाही. महायुतीचे पदाधिकारी व लोकांची छोटी मोठी कामे करा ,जनता तुम्हाला विसरणार नाही असे सांगतानाच शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने उद्धव ठाकरेंना पोटदुखी झाली आहे. सत्तेला लाथ मारून तुमच्याकडून ५० आमदार निघून गेले याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित
सत्तांतर झाल्यावर प्रत्येक कँबिनेटमध्ये शेतकरी हिताचे असंख्य निर्णय घेतले. आघाडी सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित केली. एक रूपयात पिक विमा योजना आणली, वर्षाला १२ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. ३५ हजार कोटी रूपये शेतकऱ्यांना मदत केली ५ कोटी लोकांना शासन आपल्या दारी योजनेतून लाभ मिळवून दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाच्या माध्यमातून राज्य विकासात अग्रेसर ठरले आहे. केंद्रात मोदी सरकार पु्न्हा आणण्यासाठी लोखंडेंना विजयी करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
प्रत्येक तालुक्यात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करा
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शिर्डीची नौका पार पाडायची असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात सक्षम यंत्रणा उभारून कामाला लागावे. संधीसाधू लोकांनी राज्यात एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली असली तरी महायुतीकडे नरेंद्र मोदींचे सक्षम नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदार संघात राज्य आणि केंद्राच्या विविध योजनांचा लाभ १३ लाख लोकांना झाला आहे. नगरप्रमाणेच शिर्डीची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दोन दिवसात प्रत्येक तालुक्यात निवडणुक कार्यालय सुरू करून प्रचार यंत्रणा कार्यान्वित करा, अशी सुचना कार्यकर्त्यांना महसुलमंत्री विखे पाटील यांनी केल्या.