विदर्भ, मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघात मतदान
मुंबई : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. या टप्प्यामध्ये एकूण १३ राज्यामध्ये मतदान होणार आहे. ८९ जागांसाठी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये मतदान होणार आहे. मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशात होणाऱ्या लक्षवेधी लढती या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून सीपीआय आणि भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध लढत देत आहेत. तर बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी भाजपाकडून तिसऱ्यांदा मथुरा मतदारसंघातून मैदानात आहेत. मेरठमध्ये रामायण मालिकेतील रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अरुण गोविल हेही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. काँग्रेसचे नेते शशी थरूर हे तिरुअनंतपुरममध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी सामना करत आहेत.
महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांची लक्षवेधी लढत होत आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परभणी मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांची लढत महायुतीचे महादेव जाणकार यांच्याशी होत आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात लढाई होत आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणायची जबाबदारी नुकतेच भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांच्यावर आहे. काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.






