अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात…पर्यटकांच्या खवय्येगिरीवर विरजण…
मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर)- संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासळीचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामुळे दर्याचा राजा संकटाच्या खाईत जात आहे. अवैध एल ई डी मासेमारी पारंपरिक मच्छीमारांच्या जीवावर कर्दनकाळ ठरते आहे. यामुळे मुरुड जंजिरा फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या मासळी खवय्येगिरीवर विरजण पडले आहे.
वारंवार होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढते जल प्रदुषण, समुद्रातील वाढते मानवी हस्तक्षेप, अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारी दिवसेंदिवस समुद्रातील माशांचे उत्पादन घटत चालले आहे. राज्याच्या ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनाऱपट्टीवर असलेल्या दर्याचा राजा गेली कित्येक वर्षे मासळी दुष्काळाच्या कचाट्यात सापडत चालला आहे.
या परिस्थितीत आज दर्याचा राजा संकटाच्या खाईत लोटला आहे. तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.