नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन
राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एक विकसनशिल आणि मजबून भारत उदयास आला आहे. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी देश बदलला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेली क्रांती सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणारी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत आपण देणार असलेले मत हे भाजपाला म्हणजेच मजबुत भारतासाठी आहे हे लक्षात ठेवा आणि कोकणचे सुपुत्र, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना कमळ हे चिन्ह दाबून मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोकणचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या मतदार संघातून नारायण राणे यांना निवडून पाठवायचे आहे. कारण मोदी आणि राणे म्हणजे कोकण विकासाचे कॉम्बीनेशन असल्याचे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राणे हे कोकणसाठी भरीव असा निधी आणून कोकणचा विकास करतील, अशी ग्वाही देंवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जाहीर प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर झालेल्या या जाहीर प्रचार सभेप्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रविण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेना नेते किरण सामंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भविष्यातील मजबूत भारत घडविणारी निवडणूक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ज्यांचा विश्वगुरू असा गौरव जगात होतो त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोदींचे इंजिन असलेल्या बोगीत आपल्याला बसायचे आहे, कमळासमोरील बटण दाबून नारायण राणे यांना विजयी करून पुन्हा केंद्रात पाठवायचे आहे असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
कोकणातही भविष्यात औद्योगिक क्रांती होणार आहे. अनेक उद्योग कोकणात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणात रोजगारांच्या संध्या उपलब्ध होणार आहेत. यासाठी आता नारायण राणे यांना निवडून द्या आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी मोदींच्या इंजिनला जोडून द्या आणि विकास पर्वाला सुरुवात करा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नारायणराव जगात कुठेही असोत डोळ्यासमोर व मनात कायम कोकणच
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. आज केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. राणे साहेब देशात आणि जगात कुठेही जाऊ देत त्यांच्या डोळ्यासमोर कायमच कोकण असतो, त्यांच्या मनात कायम कोकणच असतो. माझ्या कोकणसाठी काय करता येईल हाच विचार त्यांचा असतो. असे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आता पुन्हा एकदा राणेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचे आहे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.