मतदारांना आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न ठरले असफल
अमरावती : मतदान हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य असतं. पण मतदारापर्यंत साध्या सुविधा पोहोचवण्यात सरकार अपयशी ठरत असेल तर मतदान केल्याचा नेमका उपयोग काय असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच गंभीर परिस्थिती मेळगाव येथील चार गावांमध्ये उद्भवली आहे. या ठिकाणी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे मतदान केंद्रे ओस पडली. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न देखील असफल ठरले.
मेळघाटातील रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या चार गावांमध्ये एकही मतदार मतदान केंद्राजवळ फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचे पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, अशी भूमिका घेतली.