Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकशिर्डी मतदारसंघात कोपरगावच्या शांततेचीच चर्चा; शिर्डी लोकसभा निवडणुकीत कोल्हेंचा कौल कुणाला?

शिर्डी मतदारसंघात कोपरगावच्या शांततेचीच चर्चा; शिर्डी लोकसभा निवडणुकीत कोल्हेंचा कौल कुणाला?

कोपरगांव : लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शिर्डी मतदारसंघात मात्र अतिशय शांतता बघायला मिळते आहे. विशेषतः कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नसल्याने एकच चर्चेला उधाण आले आहे. नक्की कुणाच्या पारड्यात कोल्हेंचे वजन पडणार आणि कोण मदतीला मुकणार याचे कोडे सुटत नसल्याने कुतूहल वाढले आहे.

दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रत्येकजण कोल्हे माझ्याच पाठीशी राहतील असे भासवत आहे. विजयाची ग्वाही आणि मनसोक्त आकड्यांची उधळपट्टी कुणी इतर करत असले तरीही कोल्हे यांच्याशिवाय आपला विजयरथ कठीण आहे याची जाणीव उमेदवारांना असल्याने त्यांनी कोल्हेंच्या मनाचा ठाव घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे दोघेही कोल्हे यांच्या विविध कार्यक्रमात मंचावर दिसत आहेत. या निवडणुकीला किनार कोल्हे आणि विखे यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत रंग भरणार अशी चर्चा सर्वत्र आहे. कोल्हे यांची मोठी ताकद कोपरगाव मतदारसंघात व परिसरात आहे याची कल्पना सर्वच पक्षांना आहे. सुरवातीला कोपरगाव येथे झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कोल्हे यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती.त्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार सदाशिव लोखंडे यांना सहकार्यासाठी चर्चा केली. मात्र त्यानंतरही कोल्हे सक्रिय झालेले नाहीत. त्यानंतर २२ एप्रिल रोजी सदाशिव लोखंडे यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मात्र स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांची मंचावरील कमी लक्षवेधी ठरली. यामुळे मंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तब्बल एक ते सव्वा तास चर्चा करूनही कोल्हे यांनी आपले मौन अद्यापही कायम ठेवल्याने व पत्ते उघड न केल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिर्डी लोकसभेत आपले राजकीय महत्व शाबूत ठेवत कोल्हेंचे सावध पावले भल्या भल्यांना कोड्यात टाकणारे आहेत.इतर मतदारसंघात निवडणुकीचा झंझावात सुरू आहे. मात्र शिर्डी मतदारसंघात असणारी शांतता कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -