मुंबई : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र अजूनही अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य मुंबईसाठी गुरुवारी सायंकाळी वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशी चर्चा सुरू आहे.
उत्तर मुंबईत भाजपाने याआधीच पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारालाही चांगलाच वेग आला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीतर्फे बिना रामकुबेर सिंह यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा आणि वंचितचा जोरदार प्रचार सुरु असताना इकडे काँग्रेसला मात्र योग्य उमेदवार मिळत नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते देखिल गळीतगात्र झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईसाठी भाई जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच तेजस्वी घोसाळकर यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशा नावांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेली आहे. मात्र उत्तर मुंबईत घोसाळकर परिवाराचा अद्याप निर्णय होत नाही आणि उरलेले दोन उमेदवार निवडून येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर मुंबईत काँग्रेस योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे पाहायला मिळते.