समर्थ कृपा – विलास खानोलकर
श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या घरी राहावयास गेले. तेव्हा चोळप्पांची आर्थिक स्थिती वाईट होती. त्याचा संसार-प्रपंच अतिशय ओढगस्तीचा होता. ‘तुझे ऋण फेडण्यास आलो, आता निश्चिंत राहा.’ असे श्री स्वामींनी त्यास अभय दिले. आपणच काही तरी करावे. घरात डाळ-तांदूळ नाहीत, तर आम्ही स्वयंपाक तरी कशाचा करावा?
तेवढ्यात श्री स्वामींपुढे कोणी तरी शिधा आणून ठेवला. त्या शिध्याचा स्वयंपाक करण्यात आला. असेच पुन्हा एके दिवशी श्री स्वामी महाराज राधाबाईस म्हणाले, “आज स्वयंपाक पाणी नाही वाटते?” “घरात लाकडे नाहीत, घालायाला कपडे नाहीत. गृहस्थधर्म तरी कसा निभवावा?’’ या चिंतेने राधाबाई आणि येसूबाई कष्टी झाल्या होत्या. त्या दोघीही विचार करीत असतानाच, श्री स्वामी म्हणाले, “बायांनो, अशा दुःखी, कष्टी का होता? स्वयंपाक घरात जा, अन्नाने भरलेली पात्रे तिथे असताना येथे काय पाहत बसलात? घेऊन या ती.” त्या दोघीही नाराजीने जड पावलांनी स्वयंपाकघरात गेल्या. तो तिथे रसभरीत पक्वान्ने दिसून आली. त्या दिवशी त्या सिद्धात्र सेवनाने सर्वजण तृप्त झाले.
मथितार्थ :
भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी राहावयास आले होते. ज्याच्याकडे प्रत्यक्ष भगवंताचा निवास वा वास्तव्य असते, त्याच्याकडे भगवंताचे ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैषम्य हे सहा गुण म्हणजे षड्गुण ऐश्वर्य असते. परंतु असे असले तरी ते भौतिक, लौकिक दृष्टीने वैभव असेलच असे नाही. परंतु त्या घरात सुख-समाधान-शांती व प्रसन्नता सदैव नांदत असते. हे मात्र निश्चित.
चोळप्पा श्री स्वामींकडे देवभावाने पाहत होता. मात्र त्याच्या घरातील राधाबाई-येसूबाईस श्री स्वामी समर्थांची खरीखुरी ओळख पटली नव्हती. त्यांचे आकलन त्या दोघींना झाले नव्हते. तुम्ही-आम्ही सर्वसामान्य माणसे या दोघींपेक्षा वेगळी नाही. आपले देवाकडे जाणे तरी कशासाठी असते? तेथे जाऊन आपण मागतो तरी काय? आपल्या दृष्टीने देव आपली दुःखे, संकटे निवारण करणारा आणि आपल्याला सुख-आनंद देणारा असतो. म्हणून हे पाहिजे, ते पाहिजे असे सारखे आपण देवाकडे मागत असतो. आपल्या व्यथा-अडचणी-दुःखे त्याच्या कानावर घालत असतो, जशा या लीलेतील त्या दोघीही वागत होत्या. श्री स्वामींना अडचणी सांगत होत्या.
चोळप्पा मात्र संसार-प्रपंचाची होणारी फरफट, ओढग्रस्तता, कमालीची आर्थिक चणचण यांची पर्वा वा खंत न बाळगता श्री स्वामी हे प्रत्यक्ष परेश्वरच आहे, या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहत होता. त्यांच्या चरणी निष्ठापूर्वक सेवाभावी वृत्तीने वर्तन करीत होता. त्याच्या घरातील मंडळीना मोह-माया-ममत्वामुळे धनाचे आकर्षण होते, हे खरे. परंतु ते तेवढ्यापुरतेच होते. एरवी त्यांचेही श्री स्वामींवर प्रेम होतेच.
चोळप्पाची प्रपंचिक स्थिती जरी बेताची, ओढगस्तीची असली, तरी श्री स्वामी त्याच्या घरी राहावयास आल्यापासून ‘अन्नपूर्णा’ त्याच्यावर कधी रूसली नाही. तो समाधानी, शांत होता. एकदा तर श्री स्वामींनी राधाबाई आणि येसूबाईला सिद्धाची निर्मिती करून त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती आणून दिली होती. पण त्या दोघींना श्री स्वामींच्या दैवी सामर्थ्यांचे आकलन झाले नाही, हे केवढे दुर्दैव. चोळप्पाने मात्र काही प्रसंगी घरची भांडी-कुडी विकली, पण श्री स्वामींना जेवू घालून आपल्या गुरूभक्तीचे अलोट दर्शन घडविले. प्रपंच व्यवसायाला दुय्यम स्थान देऊन, श्री स्वामी सेवेला प्राधान्य दिले. हेवा वाटावा असे भाग्य श्री स्वामी महाराजांच्या रूपाने चोळप्पाच्या घरी नांदत होते. त्याच्या निस्सीम भक्तीचे ऋण फेडण्यासाठीच, ते त्याच्या घरी येऊन राहिले. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की, आण राधाबाई-येसूबाईसारखे वागायचे, का चोळप्पासारखे?
स्वामीराम चोळप्पा हनुमान
गुडीपाडव्याच्या दरम्यान उगवे सूर्य
अक्कलकोटीही उगवला समर्थ सूर्य ।।१।।
तेज तयाचे कोटी कोटी सूर्य
भक्तासाठी पहाटेचे चंद्रसूर्य।।२।।
चैत्रशुध्द द्वितीया उगवला स्वामीसूर्य
सुरु केले पृथ्वीवरी भक्तकार्य ।।३।।
तद्नंतर अवतरली रामनवमी
त्वरीत पौर्णिमेला येई हनुमान जन्मी ।।४।।
स्वामी वदे शिष्य मी चोळप्पा
गतजन्मी मी गुरू तू शिष्य ।। ५।।
तू सारे माझे कार्य करीष्य
इहलोकी सर्वगुणे पास करीष्य ।।६।।
मीच करीन तुझे कल्याण
जिवंत करीन जरी नाही त्राण ।।७।।
धन धान्य गायवासरू माझे पंचप्राण
तूला कमी पडणार नाही वाण ।।८।।
मी आधी आदि होतो श्रीराम
तूच माझा परम प्रिय हनुमान ।।९।।
अलग नाही होणार राम हनुमान
जिथे स्वामी तिथे चोळप्पाचा मान ।।१०।।
गरीब चोळप्पा घरी टेकीली पाठमान
चोळप्पाच्या झोपडीची वाढली शान ।।११।।
घेतो शेकडो भक्त स्वामी दर्शन
दिसे जणू स्वामी हाती सुदर्शन ।।१२।।
जणू श्रीकृष्ण उभा घेऊनी सुदर्शन
दर्शन घेण्यास गरीब सुदामा दर्शन ।।१३।।
सुदाम्याच्या पोह्याने भरली झोपडी
धनधान्याला कधी नाही उतरंडी ।।१४।।
आकाशातून फुले वर्षाती देव देवी चंडी
भक्तांच्या दुःखाला दिली गचांडी ।।१५।।
चोळप्पा स्वामी गुरु शिष्य जोडी
पृथ्वीवरती प्रेमाची अतुट जोडी ।।१६।।
परम भक्त जणू गरूड विष्णू
प्रेमाचे पान्हा अणू रेणू ।।१७।।
महाभारतातील अर्जुन कृष्ण वेणू
कृष्ण बलराम अतूट प्रेमजणू ।।१८।।
शंकर पार्वती गणपती मूषक जणू
सरस्वती सुंदर मोर हाती वेणू ।।१९।।
गजान्त लक्ष्मी सोबत हस्ती जणू
समर्थ चोळप्पा पसरला अणू रेणू ।।२०।।
स्वामीराम चोळप्पा हनुमान
हजार वर्षे राहिल जगात मान ।।२१।।