चार दिवस जत्रेचा धुरळा… करोडोंची उलाढाल…
मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर): मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावात चार दिवस जत्रेचा धुरळा उडाला आहे. या जत्रेत अजून ही मानाच्या शासन काठ्या नाचवण्याची परंपरा कायम आहे. या जत्रेत करोडोंची उलाढाल होत असते.
चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यापासुन या उत्सवाला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी चैत्र पौर्णिमेला तेलवडे गावात जत्रा होते, तिसऱ्या दिवशी खार आंबोली व शेवटी शिघ्रे गावात जत्रा होते मुरुड, तेलवडे, खार अंबोली, शिघ्रे अशी चार गावांत सलग चार दिवस जत्रोत्सव भरवले जाते. या चैत्र महिन्यात शासन काठ्या नाचवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आणि ती आजतागायत जपली जात आहे.
तालुक्यातील सुमारे १२ ते १५ गावातील शासन काठ्या या जत्रेत वाजत गाजत, नाचत येतात, जत्रेत आल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असताना शासन काठी नाचवली जाते कधी एका हातावर घेऊन, कधी खांद्यावर, कधी डोक्यावर, तर कधी हनुवटीवर हे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होत असते. ही काठी नाचवताना उंच उंच आभाळात अभिमानाने डौलत कधी जमीनीच्या दिशेने पडत असते त्यावेळी बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि काठी सांभाळणारे पुन्हा काठी आभाळाच्या दिशेने उभी करून नाचवू लागतात हा चित्तथरारक अनुभव पहाणाऱ्यांना येत असतो.
या जत्रेमध्ये विविध स्टॉल लावले जातात मिठाई, भजी, कटलरी, आईस्क्रीम, उसाचा रस, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल ॲक्सेसरी, मेहंदी गोंदवणे, नाव गोंदवणे, विविध प्रकारचे कपडे, चायनीज, विविध घरगुती सामान, विविध लहान मुलांचे खेळ त्यामुळे या जत्रेत मोठ्या उत्साहात लाखो लोक भेटदेत असतात त्यामुळे चार दिवसांत करोडोंची उलाढाल होत असते.