मुंबई: दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) मिळालेल्या विजयाचा पॉईंट्स टेबलमध्ये खूप फायदा झाला आहे. ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला मात्र नुकसान सोसावे लागले. दिल्लीने अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्यासाठी ऋषभ पंतने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने नाबाद ८८ धावा केल्या. तर अक्षऱ पटेलने अर्धशतक ठोकले.
आयपीएल २०२४चे पॉईंट्स टेबल पाहिले असता यात राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ८ सामने खेळलेत त्यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला. राजस्थानकडे १४ गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहेत.
केकेआरने ७ सामने खेळले आहेत आणि ५ मध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे १० गुण आहेत. सनरायजर्स हैदराबादची स्थितीही हीच आहे. त्यांचा नेट रनरेट केकेआरपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनऊने ८ सामने खेळले आहेत त्यापैकी ५मध्ये विजय मिळाला आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत.
दिल्लीला विजयामुळे मिळाला फायदा
दिल्लीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आला आहे. त्यांनी ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ मध्ये विजय मिळवला. त्यांचे ८ गुण आहेत. तर गुजरात ७व्या स्थानावर आहे. त्यांनीही ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ सामन्यांत विजय मिळवला. मात्र दिल्लीचा नेट रनरेट गुजरातपेक्षा चांगला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ ८व्या आणि पंजाबचा संघ ९व्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.